जातीय सलोखा वाढवण्यासाठी जमाते इस्लामीची मोहिम - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

11 January 2018

जातीय सलोखा वाढवण्यासाठी जमाते इस्लामीची मोहिम


कोरेगाव भीमा ला भेट देणार -
मुंबई । प्रतिनिधी - समाजातील प्रत्येताच्या हितासाठी राज्यात व देशात शांतता प्रस्थापित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कोरेगाव भीमा येथील प्रकरणानंतर राज्यातील जातीय सलोखा वाढवण्यासाठी व शांततेसाठी न्यायाच्या लढाईमध्ये सोबत राहण्याची ग्वाही जमात ए इस्लामी तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. जमात तर्फे 12 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत शांती व सद्भावनेसाठी मोहिम राबवण्यात येणार आहे. इस्लाम, विकास व शांती या विषयावर यामध्ये प्रबोधन करण्यात येईल, अशी माहिती जमात ए इस्लामीचे राज्याचे सचिव अस्लम गाझी यांनी दिली. यावेळी डॉ सलीम खान, हुमायुन शेख, हफीजुल्ला फारुकी, इम्तियाज शेख, मुजीब आदिल व पदाधिकारी उपस्थित होते. मराठा व दलित समाजामध्ये याबाबत मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोरेगाव भीमा येथे जाण्याचा मनोदय यावेळी जाहीर करण्यात आला.

जमातच्या या मोहिमेमध्ये जमैतुल उलेमा, सुन्नी समाज या विविध मुस्लिम संघटनांसह बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटना सक्रिय सहभाग घेणार आहेत. या संघटनांना सोबत घेऊन सामाजिक एकात्मतेसाठी किमान समान कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व ऊर्दू अशा चार भाषांमध्ये याबाबत प्रसिध्दीपत्रके प्रकाशित करण्यात आली आहेत. राज्यात सुमारे 20 हजार सक्रिय सभासदांच्या माध्यमातून ही मोहिम राबवण्यात येणार आहे. मुस्लिम समाजाबाबतचे सर्वसामान्य जनतेमधील गैरसमज दूर होण्यास या मोहिमेचा लाभ होईल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती, निराशा व द्वेषभावना समाप्त करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागरण केले जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 600 हून अधिक ठिकाणी कार्यक्रम होतील, त्यासाठी 14 लाख पेक्षा जास्त पत्रिकांचे वितरण केले जात आहे. सोशल मीडियावरील विविध साईटच्या माध्यमातून 50 लाख पेक्षा जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असल्याचे जमात तर्फे सांगण्यात आले. या मोहिमेसाठी विशेष वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून समाजातील विविध अनिष्ट प्रथा, स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी अशा अनिष्ट प्रथा रोखण्याचा, जगाला प्रेम व शांतीचा संदेश देण्याचा, सर्व धर्मांच्या व्यक्तींचा जगण्याचा हक्क मान्य करणे, सामाजिक सौहार्द वाढवणे, महिला व बालकांची सुरक्षा करणे, जात-धर्म-वंश-रंग-लिंग यावरून कुणालाही वेगळी वागणूक न देणे असे विविध संदेश देण्यात येणार आहेत.

Post Top Ad

test
test