Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मराठी शाळा बंद करण्याचा डाव हाणून पाडला


१६ शाळा सुरू ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश -
मुंबई । प्रतिनिधी -
पटसंख्या घटल्याचे कारण देत १६ मराठी शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा डाव शिक्षण समिती सदस्यांनी विरोध करीत हाणून पाडण्यात आला. मराठी शाळा बंद करण्यापेक्षा चांगल्या सुविधा द्या आणि पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करा असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी प्रशासनाला दिले. पालिकेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याची जबाबदारी संबंधित शाळांमधील शिक्षकांचीही असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी सांगितले. त्यामुळे अशा शाळांच्या घटलेल्या विद्यार्थी संख्येचे सर्वेक्षण करून जबाबदारीही निश्चित करा असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

येत्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांबरोबरच उर्दू, गुजराती, तेलगू भाषेच्या शाळा विद्यार्थीसंख्या घटल्याने बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून शिक्षण समितीत मांडण्यात आला. यामध्ये दादर, परळ, वडाळा, परिसरातील आठ शाळांसह मुंबईभरातील शाळांचा समावेश आहे. या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी झाल्यामुळे या शाळा बंद करून पालिकेच्या जवळच्याच शाळेत त्यांचे विलीनीकरण करण्यात येण्याचा हा प्रस्ताव होता. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक या मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शिवसेनेचे सचिन पडवळ यांनी सांगितले. दुरुस्तीच्या नावाखाली शाळांचे स्थलांतरीत करून कालांतराने या शाळा बंद करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तर शिक्षण समिती सदस्यांशी कोणतीही चर्चा न करता थेट शाळा बंद करण्याचा प्रस्ताव कसा आणला असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला. आतापर्यंत किती शाळा बंद केल्या याचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सादर करावा अशी मागणीही स्नेहल आंबेकर यांनी केली. त्यामुळे मराठी शाळा बंद करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom