पालिका आयुक्तांविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव आणणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

04 January 2018

पालिका आयुक्तांविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव आणणार


विश्वासात न घेतल्याने सपा, राष्ट्रवादी नाराज -
मुंबई । प्रतिनिधी - नगरसेवक आणि सभागृहाचे अधिकार डावलून अजोय मेहता निर्णय घेत असून महापालिकेच्या प्रशासकीय कामात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा आरोप करत विरोधी पक्ष नेते रवीराजा यांनी विरोधी पक्षाच्यावतीने सभागृहात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. यासाठी विशेष सभा बोलावण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने महापौरांना निवेदन सादर केलं जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी व समाजवादी पक्षाला याबाबत विचारात न घेतल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे हा अविश्वास ठराव बारगळण्याची शक्यता आहे.

महापालिका अधिनियमानुसार सभागृहातील एक अष्टमांश सदस्यांनी पाठिंबा दिल्यास राज्य सरकार नियुक्त आयुक्तांना परत पाठवण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सभागृहातील एकूण २२७ सदस्यांपैकी एक अष्टमांश सदस्यांच्या पाठबळावर आयुक्तांना परत पाठवण्यासाठी विरोधीपक्ष नेते रवीराजा यांनी विरोधी पक्षातील राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांसह सत्ताधारी शिवसेनेचा पाठिंबा मिळेल असे गृहित ठेऊन हा ठराव आणला आहे. मात्र याबाबत विचारात न घेता ठराव मांडत असल्याने सपा व राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनाही शेवटपर्यंत सोबत राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.

कमला मिल कंपाउंड येथील अनधिकृत हॉटेलांच्या बांधकामामध्ये पालिका आयुक्तांचा हात असल्याचा आरोप होत असतानाच पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी या प्रकरणावरून आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायचा प्रयत्न सुरु केला आहे. कमला मिल कंपाउंड मधील २९ डिसेंबरला मध्यरात्री लागलेल्या आगीत १४ जणांना हकनाक आपल्या प्राणास मुकावे लागले होते. याचे पडसाद सवत्र उमटल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका आयुक्तांनी त्वरित या प्रकरणी पालिकेच्या पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करीत संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची बदली केली होती. तसेच या प्रकरणानंतर दुसऱ्या दिवसापासून मुंबईतील अनेक हॉटेलांच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालविला आणि ही बांधकामे जमीनदोस्त केली.

कमला मिल आगीच्या घटनेला सहाय्यक आयुक्तही जबाबदार असताना त्यांची केवळ बदली करणाऱ्या आयुक्तांवर स्थायी समितीतही टीका होऊन त्यांनाही निलंबित करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती. या आगीच्या घटनेबाबत ज्या गोष्टी बाहेर येत होत्या, त्यात या ठिकाणच्या बांधकामास आयुक्तांचा पाठिंबा असल्याचे आरोप होऊ लागले. तोच धागा पकडत विरोधी पक्ष नेते रविराजा यांनी आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव आणि समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांना विचारले असता त्यांनी आपला अविश्वास ठरावास विरोध असल्याचे सांगितले. रवी राजा यांनी अविश्वास ठरावाची कल्पना दिली असली तरी याबाबत सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त चुकीचे असतील तर आम्ही पाठीशी राहू मात्र आयुक्तांविरोधी अद्यापपर्यंत स्पष्ट्पणे काहीही स्पष्ट झालेले नसल्याने आणि याबाबत सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा न झाल्याने अविश्वास ठरवाला पाठिंबा देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Post Top Ad

test
test