आयुक्तांविरोधातील अविश्वास ठरावावरून काँग्रेस एकाकी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 January 2018

आयुक्तांविरोधातील अविश्वास ठरावावरून काँग्रेस एकाकी


मुंबई । प्रतिनिधी -
महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता मनमानी कारभार करत असून प्रशासकीय कामात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असा आरोप करत कॉंग्रेसने त्यांच्याविरोधात पालिका सभागृहात अविश्वास ठराव आणायची तयारी सुरु केली होती. मात्र त्यांना कोणत्याही पक्षाने साथ दिली नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला. रवी राजा यांनी अविश्वास ठरावाचे पत्र वाचून दाखवताना राष्ट्रवादी, सपाने सहकार्य न केल्याने ठराव मांडला नसल्याचा यावेळी आरोप केला. मात्र, कॉंग्रेसने अविश्वास ठरावामागची कारणे द्यावीत, असा जाब विचारत कॉंग्रेसची सभागृहात कोंडी केली.

कमला मिल कंपाऊंडमधील आग दुर्घटनेत १४ जण मृत झाले. पालिका आयुक्तांनी यादुर्घटनेनंतर मुंबईतील सरसकट अनधिकृत बांधकामे तोडली. सलग दोन दिवस कारवाई सुरु होती. मात्र, तिसऱ्या दिवशी कारवाई थांबवली. कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावामुळे ही कारवाई थांबवली, याची माहिती द्यावी, अशी मागणी पालिका विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी सभागृहात केली. पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई करतात. स्थायी समिती व सभागृहात याबाबत अनेकदा चर्चा झाली. परंतु, अद्याप आयुक्तांकडून सभागृहाचा अवमान सुरु आहे. शिवाय, नगरसेवकांना ही विचारात घेतले जात नाही. या प्रकरणी आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मांडणार होतो. मात्र पालिका अधिनियमानुसार सभागृहातील एक अष्टमांश सदस्यांनी पाठिंबा न दिल्याने ठराव मांडत नाही, असा आरोप करत राजा यांनी राष्ट्रवादी, सपा व मनसे या विरोधीपक्षांना लक्ष्य केले. परंतु, विरोधकांनी यावेळी राजा यांची चांगलीच हजेरी घेतली. राजी यांनी पालिकेतील विरोधी पक्षातील गटनेत्यांना केवळ दोन ओळीचे पत्र पाठवून अविश्वास ठराव मांडणार असल्याची माहिती देतात. मात्र, आयुक्तांविरोधात ठराव आणण्यामागची कारणे देण्याचे टाळले. विरोधी पक्षनेते कोणाच्या तरी सांगण्यावरुन ठराव मांडत आहेत. त्यांनी याबाबतची कारणे द्यावीत, नुसती पत्रकबाजी करुन इतर पक्षांना दोषी ठरवू नये, अशी कान उघडणी करत कॉंग्रेसची कोंडी केली. भाजपनेही विरोधकांना साथ देत, राजा यांची खिल्ली उडवली. यामुळे सभागृहात अविश्वास ठरावावरुन कॉंग्रेस तोंडघशी पडल्याचे दिसून आले.

Post Bottom Ad