सव्वा कोटी बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट – आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2018

सव्वा कोटी बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट – आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत


मुंबई - पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी राज्यात यावर्षी दि. २८ जानेवारी व ११ मार्च रोजी पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक कोटी २१ लाख २९ हजार बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्यभरात ८५ हजार बुथ उभारण्यात येणार आहेत. येत्या रविवारी बालकांना पोलिओचा डोस पाजून घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले आहे.

दरम्यान, आज राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली. लसीकरण मोहिमेसाठी नियोजन व संबंधित विभागांनी करावयाची कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाचे प्रभारी सचिव संजय देशमुख यांनी आढावा घेतला. आरोग्य सेवा आयुक्त डॉ. संजीवकुमार यावेळी उपस्थित होते.

१९९५ पासून पोलिओ निर्मुलन विशेष मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हापासून राज्यात दोन वेळा विशेष पल्स पोलिओ मोहीम राबविली जाते. पोलिओचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहिम सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावर्षी रविवार, दि. २८ जानेवारीला ही मोहीम घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस सुमारे २ कोटी ९० लाख ९० हजार घरांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन बालकांना डोस पाजण्यात येणार आहे.

यावर्षी एक कोटी 21 लाख 29 हजार 350 बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत झालेल्या विशेष मोहिमेत 102 टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत एक कोटी 23 लाख 51 हजार 464 बालकांना डोस पाजण्यात आला. तर एप्रिलमध्ये 98 टक्के मुलांना डोस देण्यात आला होता.

रविवारी होणाऱ्या या मोहीमेकरीता आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण, महिला व बालविकास, परिवहन, नगरविकास, ग्रामविकास, ऊर्जा विभाग, रेल्वे, रोटरी क्लब यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सादरीकरण केले. बैठकीस टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

Post Bottom Ad