राज ठाकरेंच्या घर आणि कार्यालयाबाहेर फेरीवाले बसवले जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2018

राज ठाकरेंच्या घर आणि कार्यालयाबाहेर फेरीवाले बसवले जाणार

मनसे फेरीवाल्यांबाबत बुधवारी भूमिका जाहीर करणार -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यापासून फेरीवाल्यांचा प्रश्न गाजत आहे. फेरीवाल्यांना विरोध करणाऱ्या आणि फेरीवाल्यांविरोधात खळखट्याक आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान व मनसेच्या कार्यालयाबाहेरच फेरीवाल्यांना बसण्यासाठी महापालिकेने जागा निश्चित केल्या आहेत. यामुळे ज्यांनी फेरीवाल्यांना विरोध केला त्यांच राज ठाकरे यांच्या घराबाहेर आता कायद्याने फेरीवाले बसवले जाणार आहेत. यामुळे मनसेने याला विरोध केला असून बुधवारी याबाबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मनसे आपली भूमिका जाहीर करणार आहे.

मुंबईमध्ये फेरीवाल्यांना आपला धंदा करता यावा म्हणून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात होती. मात्र एल्फिस्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आवाहन पालिका आणि पोलिसांना केले होते. महापालिकेने कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा ईशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यादरम्यान महापालिकेकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास सुरु करण्यात आली. यामुळे फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्र सरकारने बनवलेल्या फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली गेली. मुंबई महानगरपालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत २४ विभागात एकूण १३६६ रस्त्यांवर ८५ हजार ८९१ फेरीवाले बसवण्यासाठी एक यादी जाहीर केली आहे. महापालिकेने याबाबत सूचना व हरकती मागवल्या आहेत.

पालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार मनसेचे मुख्यालय असलेल्या पद्माबाई ठक्कर मार्गावरील राजगड कार्यालयाबाहेर १०० तर शिवाजी पार्क येथील केळुस्कर रोडवर असलेल्या राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवास स्थानाबाहेर १० फेरीवाले बसवण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या बांद्रा कलानगर येथील मातोश्री बंगल्याच्या आजूबाजूला एकही फेरीवाला बसवण्यात आलेला नाही. यामुळे मनसेकडून याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान पालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार शिवसेनेच्या सेनाबाहेर एनसी केळकर मार्गावर १००, भवानी शंकर रोडवर २००, गोखले रोडवर २०० असे ५०० तर भाजपचे कार्यालय असलेल्या दादर येथील फाळके रोडवर ३१० फेरीवाले बसवले जाणार आहेत.

धोरणाला नव्हे मनमानीला विरोध - 
फेरीवाल्यांच्या धोरणाला आमचा विरोध नाही. मात्र फेरीवाल्यांना मनमानी पणे कुठेही बीबसवण्यास आमचा विरोध आहे. ज्या ठिकाणी फेरीवाले नव्हते त्या ठिकाणी तसेच वन वे मध्ये फेरीवाले बसवण्यास आमचा विरोध आहे. राज ठाकरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. त्यांनी बुधवारी सकाळी मनसे नेते व विभाग अध्यक्षांची एका बैठक बोलावण्यास सांगितली आहे. बैठकीत मनसेची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल
- संतोष धुरी, माजी नगरसेवक, मनसे

न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई -
फेरीवाला धोरणासंदर्भातील निर्णय न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेली कमिटी घेत आहे. जाणीवपूर्वक कुठेही फेरीवाले बसवले जात नाहीत. न्यायालयाच्या निर्देशानुसार हॉकिंग आणि नॉन हॉकिंग झोन बनवण्याचे काम सुरु आहे. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून योग्य जागा कोणती याचा विचार करुनच निर्णय घेतला असेल.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई

हरकती घेतल्यास त्याचा विचार करू - 
मुंबई महानगरपालिकेने फेरीवाल्यांना बसण्याच्या जागा ठरवताना नगरसेवकांबरोबर चर्चा केलेली नाही. महापालिकेने फेरीवाल्यांसाठी ज्या जागा निश्चित केल्या आहेत. त्याबाबत कोणाला त्रास होणार असेल तर त्याविरोधात संबंधितांनी हरकती घ्याव्यात. त्या हरकतीची दखल महापालिका सभागृह नक्की घेईल.
- यशवंत जाधव, सभागृह नेते, मुंबई महानगरपालिका

सूचना नंतर निर्णय घ्यावा - 
फेरीवाला धोरणांबाबत सर्वांचे मत विश्वासात घेतले पाहिजे. कोणाला हरकत असल्यास त्याचा फेरविचार करावा. नागरिक आणि संबंधितांच्या सूचनांनंतरच निर्णय घेण्यात यावा.
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते

आवश्यक नाही तिथे फेरीवाले नको - 
रहदारीला अडथळा होत असेल तर फेरीवाल्यांना बसू देता काम नये. आवश्यक नसल्यास तिथे फेरीवाले नको.
- मनोज कोटक, गटनेते, भाजपा 

Post Bottom Ad