Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वांद्रे आणि मुलुंडमध्ये १५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर २४ तास पाणीपुरवठा


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईकरांना २४ तास पाणी पुरवठा करण्याच्या महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पहिला प्रयोग १५ ऑगस्टपासून सुरू होईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्थायी समितीमध्ये स्पष्ट केले. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर प्रथम वांद्रे आणि मुलुंडमध्ये राबविण्यात येणार असल्याने, या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या ‘मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमा’ अंतर्गत एच वेस्ट प्रभागात गझदरबंध झोपडपट्टी येथे जलवाहिन्या टाकण्याच्या कामासंदर्भातील सुमारे १२ कोटींचा प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजूरीसाठी आला. यावेळी मुंबईतील दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर २४ पाणीपुरवठा करण्याची योजना रखडल्याने सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. प्रशासनाने मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार असा सवाल सदस्यांनी उपस्थितीत केला. यावर बोलताना भाजपचे गटनेते मनोज कोटक म्हणाले की, हे पायलेट प्रोजेक्ट कधी सुरू होणार? या कामांना अद्याप सुरवात झाली नाही. पालिकेची ही महत्वकांक्षी योजना कागदावरच राहिली तर मुंबईकरांचे स्वप्न स्वप्नच राहील, त्यामुळे या प्रोजेक्टसाठी टास्क फोर्स नेमा, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईतील पाणी वितरणात त्रुटी असून मुंबईकरांना समान पाणी वाटप करावे अशी मागणी यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा, सपाचे रईस शेख, शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी केली. दरम्यान मुंबईची भौगोलिक परिस्थिती, सतत वाढणारी लोकसंख्या, झोपडपट्ट्या, जलवाहिन्यांवरची बांधकामे या अडचणींवर मात करून हा प्रकल्प राबवणे अवघड असल्याची कबुली यावेळी अतिरिक्त आयुक्त मुखर्जी यांनी दिली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom