शिवसेनेत गटबाजी नाही - आदित्य ठाकरे


मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेत राजकीय वातावरण तापले आहे. स्थायी समितीमधून सत्ताधारी शिवसेनेने सातमकर आणि चेंबूरकर या आपल्या जेष्ठ नगरसेवकांचा राजीनामा घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेनेत नाराजी असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना मुबंई महापालिकेत नगरसेवकांमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. जे काही बोलले जात आहे त्या निव्वळ अफवा आहेत. महापालिकेतील घडामोडींचा निर्णय हा पक्षपातळीवरचा निर्णय आहे. जे काही बदल होत असतात ते पक्षाकडून होत असतात. तसेच हे सर्व निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतात, असे स्पष्टीकरण शिवसेनेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिका शालेय विभागाच्या कार्यक्रमानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.

महापालिकेतर्फे परळच्या सेंट झेवियर्स मैदानावर बालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर विश्वनाथ महाडेेश्वर ,उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर, नगरसेवक स्नेहल आंबेकर, सचिन पडवळ, सिंधू मसूरकर, अमेय घोले, साईनाथ दुर्गे, सईदा खान, युवा सेनेचे प्रदीप सावंत, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उप आयुक्त मिलीन सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात, शालेय विद्यार्थ्यांनी, मल्लखांब, दोरीवरच्या चित्तथरारक कवायती, कराटे स्वसंरक्षण प्रात्याक्षिके, शिवशाही, कोळीनृत्य, ग्रुप डान्सचा आविष्कार ‘बालक मेळाव्यात’ केला. यावेळी बोलताना महापालिका शाळांमध्ये फक्त ३१२ शारीरिक शिक्षण शिक्षक आहेत. २००६ पासून शारीरिक शिक्षक पदांच्या भरतीवर बंदी आहे. अनेक पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी भरतीवरील बंदी उठवणे गरजेचे असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षणाबरोबरच खेळांचे धडे देणेही महत्त्वाचे आहे. यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन खूप उपयुक्त ठरणार आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या धाडसी क्रीडा कौशल्य व कसरती यांचे कौतूक केले.
Tags