Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा, बोनसची रक्कम पगारातून कापणार नाहीत


मुंबई । प्रतिनिधी -
बेस्ट कर्मचाऱ्यांना उपक्रमाची आर्थिक स्थिती खराब असल्याने मुंबई महापालिकेकडून आर्थिक मदत घेऊन दिवाळीचा बोनस वाटप करण्यात आला होता. बेस्ट उपक्रमाने आपल्यात सुधारणा न केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. याचे पडसाद आजच्या बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. समिती सदस्यांनी पालिकेच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्यावर बोनसची ५०० रुपये इतकी रक्कम दरमहा पगारातून न कापण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने आजच्या बैठकीत जाहीर केला.

बेस्ट उपक्रमाची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही. त्यातच दिवाळीचा बोनस देण्यासाठी पालिकेकडून २५ कोटी रुपयांची आर्थिक मदत घेण्यात आली होती. हे २५ कोटी रुपये बेस्ट उपक्रमाने आपल्यात सुधारणा केल्यास कापले जाणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र बेस्टने सुधारणा केल्या नसल्याचे सांगत आयुक्तांनी बोनसची रक्कम पगारातून कापण्यास सांगितले होते. बेस्ट कर्मचाऱ्यांना ५ हजार ५०० रुपये बोनस दिला गेला होता. त्याबदल्यात त्यांच्या पगारातून दरमहा ५०० रुपये कपात केले जाणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. याबाबत भाजपाचे बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. बेस्टचे कामगार पेंग्विन असते तर बरे झाले असते, पेंग्विनला रहायला पालिका प्रशासन वातानुकूलित जागा देऊ शकतात, पेंग्विनवर करोडो रुपये पालिका खर्च करू शकते पण बेस्ट कामागाराना द्यायला पालिकेकडे २१ कोटी नाहीत ही शोकांतिका असल्याचे म्हणत सुनील गणाचार्य यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापण्याची सूचना नेमकी कुणी दिली? आयुक्तांनी दिली की महाव्यवस्थापकांकानी असा प्रश्न गणाचार्य यांनी यावेळी उपस्थित केला. बेस्टला कुठलीही मदत करायची नाही असे पालिकेचे मत झाले आहे. पालिकेचा हा कारभार बघा आणि थंड बसा अशीच अवस्था आपल्या सर्वांची झाल्याचे गणाचार्य यावेळी म्हणाले. पालिका आयुक्त म्हणतील त्याला फक्त हो बोला यासाठीच आम्ही आहोत का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. बेस्टच्या नरडीला हात घालण्याचा प्रयत्न कोणी तरी करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बोनसची रक्कम पगारातून कापण्याच्या निर्णयावर सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर महाव्यवस्थापकांनी बोनसची रक्कम पगारातून कापली जाणार नसल्याचे जाहीर केले. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom