दवाखान्यांमध्ये चाचण्यांची सुविधा तर प्रसूतीगृहांमध्ये अतिदक्षता विभाग सुरु करण्याची मागणी - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2018

दवाखान्यांमध्ये चाचण्यांची सुविधा तर प्रसूतीगृहांमध्ये अतिदक्षता विभाग सुरु करण्याची मागणी


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये विविध चाचण्या करण्याची तर प्रसूतीगृहांमध्ये व्हेंटीलेटर्ससह अतिदक्षता विभाग नसल्याने करदात्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये विविध चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी केली आहे. तर प्रसूतीगृहांमध्ये व्हेंटीलेटर्ससह अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली आहे.

नॅशनल हेल्थ अर्बन मिशनच्या सर्वेक्षणानुसार मुंबईत १५ हजार नागरिकांकरिता एक दवाखाना आवश्यक आहे. मात्र सध्या ५० हजार नागरिकांकरिता एक दवाखाना आहे. महापालिकेच्या दवाखान्यांची जागा रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी नसल्यामुळे तेथे सर्व रुग्णांची तपासणी करणे तसेच चिकीत्सालयीन तपासण्या करणे शक्य होत नाही. नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात किंवा खासगी प्रयोगशाळांमधून तपासण्या करून घ्याव्या लागतात. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आरोग्य तपासणी, प्रथमोपचार, याचबरोबर रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी इत्यादी सुविधा आवश्यक आहेत, मात्र सध्या या सुविधा उपलब्ध नाहीत. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून व महापालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयावरील भार कमी करता यावा म्हणून महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आरोग्य तपासणी, प्रथमोपचार, याचबरोबर रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी इत्यादी चाचण्या करण्याबाबतच्या सुविधा द्याव्यात अशी मागणी जावेद जुनेजा यांनी केली आहे.

तसेच मुंबई महानगरपालिकेची २७ प्रसूतिगृहे आहेत. या प्रसूतीगृहांमध्ये प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात सेवांबरोबर नवजात शिशू कक्ष व बालरोग आंतररुग्ण विभागाची सुविधा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रत्येक रुग्णालयात अतिदक्षता विभाग असणे सक्तीचे आहे. मात्र पालिकेच्या २७ पैकी एकाही प्रसूतीगृहामध्ये अतिदक्षता विभाग उपलब्ध नाही. प्रसूतीच्यावेळी अथवा नंतर एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्ण महिलेस किंवा तिच्या बालकाला अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागते. या परिस्थितीत अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर असलेली रुग्णालये नेमकी कुठे आहेत याची माहिती नसल्याने महिला व तिच्या बाळाच्या जीवाला शोका निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये व्हेंटीलेटर्ससह अतिदक्षता विभाग सुरु करावा किंवा या सुविधा असलेल्या महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांना त्या परिसरातील प्रसूतिगृहे संलग्न करावीत अशी मागणी सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

Post Bottom Ad