रस्ते घोटाळ्याप्रकरणी 150 पालिका अभियंत्यांवर कारवाई होणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

21 February 2018

रस्ते घोटाळ्याप्रकरणी 150 पालिका अभियंत्यांवर कारवाई होणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेत रस्ते घोटाळा चांगलाच गाजला आहे. रस्ते घोटाळ्याच्या चौकशी वेळी 234 रस्त्यांच्या कामात अनियमितता आढळली होती. त्यापैकी 34 रस्त्यांच्या कामांमधील घोटाळ्याच्या चौकशी अहवालात 96 अभियंते दोषी आढळले होते. त्यानंतर 200 रस्त्यांच्या कामांतील घोटाळा अहवाल येत्या तीन - चार दिवसांत सादर केला जाणार आहे. या अहवालात सुमारे 150 अभियंते अडकण्याची शक्यता आहे. अभियंते, अधिकारी दोषी असणारा हा महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याची नोंद होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या घोटाळ्याचा पहिल्या टप्प्यातील 34 रस्त्यांचा चौकशी अहवालात 96 अभियंते दोषी आढळले. अहवालात अधिकार्‍यांवर कामातील अनियमिततेला जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये घोटाळ्याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांना नोकरीवरून काढून टाकण्याची कारवाई होणार आहे. तत्कालिन महापौर स्नेहल आंबेकर यांनी रस्त्यांच्या कामामध्ये अनियमितता असल्याची तक्रार केल्यानंतर आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी आदेश दिले होते. चौकशीमध्ये 234 रस्त्यांच्या कंत्राटांमध्ये सुमारे 959 कोटी रूपयांचा घोटाळा झाला उघड झाला होता. घोटाळा झाल्याचे समोर आल्यामुळे पालिका प्रशासानने एकाच वेळी 100 अभियंत्यांना नोटीसा धाडल्या होत्या. 2016 मध्ये अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या चौकशी समितीच्या अहवालात रस्ते कंत्राटातील 34 रस्त्यांच्या कामात अनियमितता आढळून आली होती. रस्ते घोटाळ्याच्या दुसर्‍या टप्प्यातील चौकशीत दोनशे रस्त्यांची तपासणी करण्यात आली होती व त्यातही अनियमितता आढळली होती. हा 200 रस्त्यांचा अहवाल चौकशी समितीने आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर केला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत हा अहवाल जाहीर केला जाणार असून यांत सुमारे 150 अभियंते अडकण्याची शक्यता आहे. यांत पहिल्या टप्प्यातील अहवालात दोषी असणारे 84 अभियंते या अहवालातही अडकले असल्याची माहिती समोर येते आहे. दोषी अभियंत्यांचे निलंबन होण्याबरोबरच अनेकांवर दंडात्मक कारवाई बढती रोखली जाणार आहे. शिवाय नोकरीतून बडतर्फची कारवाईही केली जाऊ शकते. 200 रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी उपायुक्त रमेश बांबळे आणि मुख्य चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांनी केली.

Post Top Ad

test