दिनानाथ नाट्यगृहाची दोन वर्षातच दुरावस्था - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

07 February 2018

दिनानाथ नाट्यगृहाची दोन वर्षातच दुरावस्था


खर्चाची चौकशी करा - भाजपची मागणी
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईमधील विलेपार्ले येथे असलेले दिनानाथ नाट्य गृह दोन वर्षांपूर्वी दुरुस्त करून नव्याने बांधण्यात आले होते. पालिकेने दुरुस्तीसाठी १४ कोटी रुपये खर्च केले होते. याचे श्रेय शिवसेनेने घेतले होते. मात्र, दोन वर्षातच नाट्यगृहामधील समस्यां वाढल्याने दुरुस्तीचा हा पैसा गेला कुठे असा प्रश्न विचारात या दुरुस्तीच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपने सुधार समितीत लावून धरली.

दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते विलेपार्ले नाट्यगृहाचे मोठ्या दिमतीत उद्घाटन झाले होते. दोन वर्षानंतर येथील मंडई, शौचालय, नाट्यगृहांमध्ये विविध समस्यां निर्माण झाल्या आहेत. सुधार समितीच्या पाहणीनंतरही अद्याप समस्या सुटलेल्या नाहीत. घाणेरडी शौचालय, दरवाज्यांच्या कड्या तुटल्या आहेत. लाद्या ही निखाळलेल्या आहेत. शौचालयांची सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली असते. व्यापाऱ्यांना याचा प्रंचड त्रास होत असल्याचा आरोप करत, भाजपच्या सदस्या ज्योती अळवणी यांनी बुधवारी सुधार समितीत आलेल्या विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर महापालिका मंडईच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावावर हरकत घेतली. पालिकेने नाट्यगृह व मंडईच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी खर्च केले. मात्र, येथील समस्यांचे ग्रहण सुटलेले नाही. प्रशासनाकडून याबाबत दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे या कामांची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी अळवणी यांनी केली. भाजपचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश गंगाधरे त्यांना पाठिंबा देत, सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला लक्ष्य केले. दुरुस्तीसाठी १४ कोटी खर्च केल्यानंतरही पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पालिकेने दुरुस्तीवर केलेल्या खर्चाचा ताळेबंध सादर करावा, अशी मागणी गंगाधरे यांनी लावून धरली. पालिकेला हस्तांतरीत केलेल्या मंडई व नाट्यगृहांची देखभाल करणे गरजेचे असल्याची भूमिका शिवसेनेने मांडली. दरम्यान, मंडईच्या पुनर्विकासाला सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी मंजुरी दिली व चौकशीची मागणी फेटाळून लावली.

'टाईमपास' शब्दावरून गोंधळ - 
नाट्यगृहाची दोन वर्षातच दुरावस्था झाल्याने कामांची चौकशी करावी व चौकशीची हमी आयुक्तांनी द्यावी, अशी मागणी भाजपा सदस्यांनी लावून धरली. यावेळी संतापलेल्या अध्यक्ष बाळा नर यांनी टाईमपास का करताय, असे भाजपा सदस्यांना सुनावले. टाईमपास या शब्दावर गंगाधरे यांनी आक्षेप घेतल्याने सभेत गोंधळ झाला. मात्र, त्यांना अन्य सदस्यांनी साथ न दिल्याने भाजपा एकाकी पडल्याचे दिसून आले.

Post Top Ad

test