१० फेब्रुवारीला "राष्ट्रीय जंतनाशक दिनी" शाळांमधील विद्यार्थ्यांना देणार 'अल्बेंडेझॉल'


मुंबई । प्रतिनिधी -
शनिवारी १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन आहे. या दिनानिमित्त (National Deworming Day) देशभरातील १ ते १९ या वयोगटातील मुलामुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर 'अल्बेंडेझॉल' ची गोळी देण्यात येणार आहे. हे औषध सर्व वयोगटासाठी सुरक्षित आहे. तसेच कुपोषण, ऍनेमिया यासारख्या रोगांच्या प्रतिबंधासाठी जंतनाशक औषध घेणे सहाय्यकारी आहे. त्यामुळे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेत सर्व संबंधितांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण, औषध व सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव संजय देशमुख यांनी केले आहे.

'अल्बेंडेझॉल' औषध दिल्यानंतर काही व्यक्तींना सौम्य स्वरुपात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोकेदुखी, पोटदुखी वा थकवा यासारखे लक्षणे दिसू शकतात. यात काहीही गंभीर नसून शरीरात जंतसंसर्ग असल्यास त्यावर होणा-या औषधाच्या परिणामामुळे ही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास संबंधिताला सावलीत विश्रांती करण्यास घेऊन जावे आणि स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. तसेच त्याला / तिला किमान २ तास देखरेखीखाली ठेवावे, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे. १ ते १९ या वयोगटातील मुलांमध्ये आढळून येणा-या कुपोषण, ऍनेमिया यासारख्या रोगांमागे पोटातील जंत हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे विविध अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या रोगांच्या प्रतिबंधासाठी जंतांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन, वर्ष २०१५ पासून दरवर्षी देशभरात वर्षातून एक दिवस (१० फेब्रुवारी) 'राष्ट्रीय जंतनाशक दिन' मोहिम स्वरुपात आयोजित करण्यात येत आहे. या वर्षी देखील संपूर्ण देशभरातील शाळा व अंगणवाड्यांमधून 'अल्बेंडेझॉल' या औषधाचे वाटप करण्यात येणार आहे.