कार्यकाळ संपल्यावर महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा अभ्यासदौरा - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

12 February 2018

कार्यकाळ संपल्यावर महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा अभ्यासदौरा


मुंबई | अजेयकुमार जाधव -
मुंबई महानगर पालिकेचे कामकाज सभागृह आणि समितीच्या माध्यमातून चालते. या समित्यांचा वार्षिक कार्यकाळ संपत आला असताना महिला व बालकल्याण समितीचे सदस्य उडीसा राज्यातील भुवनेश्वर महापालिकेतर्फे राबवल्या जाणा-या विविध योजना आणि उपक्रम व तेथील कार्यपध्दती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे हे सदस्य आपला कार्यकाळ संपल्यावर या दौऱ्यामधून पालिकेला काय देणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच हा दौरा म्हणजे सदस्यांनी एक पिकनिक असल्याची टिका केली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेचे कामकाज १८८८च्या नियमानुसार चालते. महापालिकेचे कामकाज चालावे म्हणून महासभा, वैधानिक व विशेष समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. समित्यांचा कार्यकाळ एप्रिल ते मार्च असा एक वर्षाचा असतो. दरवर्षी समिती सदस्य व अध्यक्षांची निवड एप्रिल महिन्यात करण्यात येते. विविध समित्यांचे अभ्यास दौरे समितीचा कार्यकाळ सुरु झाल्यावर काढल्यास वर्षभर त्याचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देता येणे शक्य आहे. मात्र समितीचा कार्यकाळ संपताना काढलेल्या अभ्यासदौऱ्यामुळे नागरिकांना कोणताही फायदा होत नसल्याने अशा अभ्यास दौऱ्यावर अनेक वेळा टिका झाली आहे. या टिकेनंतरही मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या उडीसा राज्यातील दौऱ्याला मंजुरी दिली आहे.

उडीसामधील भुवनेश्वर महापालिकेतर्फे राबवल्या जाणा-या विविध योजना आणि उपक्रम व तेथील कार्यपध्दती जाणून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित केल्याचे समजते. भुवनेश्वर महापालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान - दिनदय़ाळ अंत्योदय़ योजना आणि महिला बालकल्याण निधी अंतर्गत राबवण्यात येणा-या विविध योजना आणि उपक्रम व तेथील कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्याचा उद्देश असल्याचे म्हटले आहे. येथील योजनांची पाहणी करून मुंबई शहरात त्या योजना कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने या दौ-याचा विचार करण्यात आल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून लवकरच या दौ-याबाबत नियोजन केले जाणार असल्याचे समजते. मात्र दौऱ्यावर जाणारे महिला व बाल कल्याण समितीचे सदस्य येत्या मार्च महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आपल्या निवृत्ती नंतर महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून त्या योजना मुंबई शहरात कशाप्रकारे कार्यान्वित करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Post Top Ad

test