Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

३६ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्‍या क्रमांकाचा मानकरी


नवी दिल्ली : केंद्रीय युवक क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या’ पहिल्याच आयोजनात महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत ३६ सुवर्णांसह दुसरा क्रमांक मिळविला आहे. आज या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने १२ सुवर्ण पदक पटकाविली यात बॉक्सिंग मध्ये ७ सुवर्ण मिळाली.

बॉक्सिंगमध्ये राज्याला ७ सुवर्ण -
या स्पर्धेत आज महाराष्ट्रातील बहुंताश खेळाडुंचे अंतिम सामने होते. बॉक्सींगमध्ये महाराष्ट्राने तब्बल ७ सुवर्ण पदके मिळवून चमकदार कामगिरी केली. मुलांच्या विविध वजनी गटात ५ सुवर्ण पदके आली, विशेष म्हणजे पुणे येथील बॉइज स्पोर्ट कंपनीच्या ४ खेळाडुंनी सुवर्ण कामगिरी केली, ८० किलो वजनी गटात सतींदर, ६३ किलो वजनी गटात विजयदीप, ५० किलो वजनी गटात नवबा सिंह आणि ४८ किलो वजनी गटात अनिल या सर्वांनी सुवर्ण पदक जिंकली. याशिवाय, पुणे येथील बॉइज स्पोर्टस् स्कूल आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटच्या भावेश कट्टीमनी याने ५२ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले. मुलांप्रमाणेच मुलींनीही बॉक्सींगमध्ये सुवर्णपदक पटकाविली यात, नागपूर येथील सेंट विन्सेट पल्लुटी स्कुलची अल्फीया तरन्नूम हीने ८० किलो वजनी गटात सुवर्ण तर ६६ किलो वजनी गटात मुंबईच्या निर्मला मेमोरियल फाऊंडेशन वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या मितीका गुणेले हीने सुवर्ण पदक पटकाविले.

जिम्नॅस्टिकमध्ये २ तर ज्युडो, बॅडमिंटन आणि धनुर्विद्येत प्रत्येकी १ सुवर्ण -
जिम्नॅस्टिकमध्ये मुलींनी सुवर्ण पदकांची कमाई केली. बॉल रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारात मुंबईच्या प्रभादेवी येथील कॉनव्हेंट गर्ल्स हायस्कुलच्या क्रिशा छेडा हीने तर हुप रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारात ठाणे येथील बिल बाँग हाय इंटरनॅशनल स्कुलच्या अनन्या सोमन हीने सुवर्ण पदक पटकाविले.

ज्युडो क्रीडा प्रकारात ९० किलो वजनी गटात मुंबई वांद्रे येथील सेंट ॲड्रूस महाविद्यालयाचा अदनान शेख याने सुवर्ण पदक पटकाविले. धनुर्विद्येत कम्पाउंड वैयक्तिक प्रकारात रत्नागिरी येथील एसव्हीजेसीटी इंग्लीश स्कूलच्या इशा पवार हीने सुवर्ण पदकावर नाव कोरले.

नागपूर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची मालवीका बनसोड हीने मुलींच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत २१-१२ आणि २१-१० असा दणदणीत विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले.

६ रजत पदकांची कमाई -
मुलींच्या जिम्नॅस्टिक क्लॅब रिदमीक व हुप रिदमीक जिम्नॅस्टिक प्रकारात दादर, मुंबई येथील बालमोहन विद्यामंदिरच्या श्रीया कुलकर्णी ने २ रजत पदकांची कमाई केली. धनुर्विद्येच्या रिकर्व वैयक्तीक प्रकारात अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील गुरुकुल पब्लिक स्कूलच्या सुमेध मोहोड याने रजत पदक पटकाविले. मुलीच्या ज्युडो क्रीडा प्रकारात ७० किलो वजनी गटात नवापाडा, ठाणे येथील सरस्वती माध्यमिक शाळेच्या अपुर्वा पाटील हीने रजत पदक पटाकाविले. मुलांच्या बॉक्सिंगमध्ये ६६ किलो वजनी गटात पुणे येथील सेंट पॅट्रीक हायस्कुलच्या केशव हंस याने रजत पदक जिंकले. मुलींच्या बॉल रिदमीक जिम्नॅस्टिक प्रकारात ठाणे येथील हिरानंदानी फाउंडेशन स्कुलची प्रियंका आचार्य हीने रजत पदक मिळविले. आज महाराष्ट्राला विविध क्रीडा प्रकारात एकूण ९ कांस्य पदक मिळाली.

अंतिम पदकतालिकेत महाराष्ट्र दुसऱ्‍या क्रमांकावर -
आज स्पर्धेच्या ९ व्या व अंतिम दिवशी महाराष्ट्र ३६ सुवर्ण पदक मिळवून पदतालिकेत दुसरा क्रमांकावर राहिला. याशिवाय ३२ रजत आणि ४३ कांस्य पदकांसह महाराष्ट्राने एकूण १११ पदके पटकाविली आहेत. हरियाणा ३८ सुवर्णांसह पहिल्या क्रमांकावर राहिला. या सुवर्णांसह हरियाणा ने २५ रजत आणि ३८ कांस्य पदकांसह एकूण १०२ पदकांची कमाई केली आहे. २५ सुवर्णांसह एकूण ९४ पदके मिळवून यजमान दिल्ली तिसऱ्‍या क्रमांकावर राहिला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom