Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वृक्षप्राधिकरण वृक्षतोड व बिल्डरांसाठी आहे का ? - महापौर


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत विकासाच्या नावाने मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड सुरु आहे. मुंबई मेट्रोसाठी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले आहे. याचे पडसाद वृक्ष प्राधिकरण बैठकीत उमटले होते. त्यांनतर आता 'वृक्ष प्राधिकरण हे वृक्षतोडीसाठी, बिल्डरांसाठी आहे का' ? असा संतप्त प्रश्न मुंबईच्या महापौरांनी उपस्थित केला आहे.


वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग), येथे बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्‍या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यानविद्या विषयक कार्यशाळेचे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी मध्‍यप्रदेशातील रतलाम शहराच्‍या महापौर डॉ. सुनीता यार्दे, बाजार व उद्यान समितीच्‍या अध्यक्षा सान्‍वी तांडेल, नगरसेवि‍का समिक्षा सक्रे, सुवर्णा करंजे, प्रि‍ती पाटणकर, ऋतुजा तारी, उप आयुक्‍त (आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन) डॉ. किशोर क्षीरसागर, ई’विभागाचे सहाय्यक आयुक्‍त (प्र.) साहेबराव गायकवाड, माजी नगरसेवक मंगेश बनसोड, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य, उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी, प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी तसेच नागरिक उपस्थित होते.

यावेळी महापौर पुढे म्हणाले की, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे मागील २२ वर्षांपासून हे प्रदर्शन प्रतिवर्षी भरविण्यात येते. दरवर्षी या प्रदर्शनात नाविण्य व कल्पकता असते. ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे, वृक्षतोड कमी करुन पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्‍यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईकरांना झाडे, फुले, फळे आदींचे आकर्षण निर्माण करण्यासाठी व मानसिकतेत बदल घडविण्यासाठी हा उपक्रम अत्यावश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले. जगभरातील १९७ देशांच्‍या भरलेल्‍या परिषदेत पर्यावरणावर चिंता व्‍यक्‍त करण्‍यात आली असून वृक्ष जपले तरच प्राणवायुचे प्रमाण वाढून मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार असल्‍याचे ते म्‍हणाले. मुंबईकर नागरिकांमध्ये झाडे, फुले, फळे आणि भाज्या याविषयी अधिकाधिक प्रेम वृद्धिंगत होण्‍यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले प्रदर्शन उपयुक्‍त असून प्रत्‍येक मुंबईकर नागरिकांनी आपल्‍या कुटुं‍बियांसमवेत या प्रदर्शनाला आर्वजून भेट द्यावी, असे आवाहन महापौरांनी केले. महापालिका आयुक्‍त अजोय मेहता प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधताना म्‍हणाले की, यावर्षीच्‍या प्रदर्शनात झाडे, फुले, फळे आणि भाज्या यांचे नवनविन प्रकार पाहायला मिळत असून मुंबईकर नागरिकांसाठी ती एक पर्वणीच असून आपल्‍या कुटुंबियांसमवेत या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केली. त्‍यासोबतच निळा गुलाब हा यावर्षीच्‍या प्रदर्शनाचे आकर्षण असून सर्वांनी तो आर्वंजून बघावा असेही ते म्‍हणाले. २३ व्‍या झाडे, फुले, फळे आणि भाज्यांचे प्रदर्शन रविवार, दिनांक ११ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी विनाशुल्क खुले आहे.

उद्यान प्रदर्शनाची रतलामच्या महापौरांना भुरळ -
मुंबई महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागच्या माध्यमातून भायखळा येथील राणीबागेत भरविण्यात आलेल्या झाडे, औषधी वनस्पती, फुले व भाज्यांच्या प्रदर्शनाची मध्यप्रदेशमधील रतलामच्या महापौर डॉ. सुनीता यार्दे यांना चांगलीच भुरळ पडली. रतलाम येथेही अशाच स्वरूपाचे प्रदर्शन तेथील नागरिकांसाठी, मुलांसाठी आयोजित करण्याची इच्छाही त्यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा सान्वी तांडेल यांच्याकडे यावेळी व्यक्त केली. त्यावर सान्वी तांडेल यांनी, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन व मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.

कोर्टात महापालिकेची बाजू मांडू - आयुक्त
मुंबई महापालिका उद्यान विभाग व वृक्षप्राधिकरण एका बाजूला झाडे, फुले व फळे यांचे प्रदर्शन भरवित आहे. पर्यावरणाचे रक्षण करत आहे, तर दुसरीकडे मेट्रो रेल्वे, एसआरए व अन्य प्रकल्पासाठी वृक्ष तोडीला परवानगी दिल्याने महापालिकेला न्यायालयाने फटकारले आहे, याबाबत पालिका आयुक्त अजोय मेहता यांना विचारले असता आम्ही महापालिकेची भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टात मांडू, असे उत्तर देऊन आयुक्तांनी याविषयावर अधिक बोलणे टाळले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom