Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नमुना निवासी पुनर्विकास सदनिकांचे उद्घाटन


मुंबई - बी. डी. डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा निर्णय ही एक आव्हानात्मक बाब होती, मात्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयांमुळे सुमारे १६ हजार बी. डी. डी. वासियांच्या हक्काच्या मोठ्या घराचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी सॅम्पल फ्लॅटच्या माध्यमातून शासनाने एक पाऊल पुढे टाकल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले. 

महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी बी. डी. डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नायगाव-दादर व ना. म. जोशी मार्ग - परळ येथे उभारण्यात आलेल्या नमुना निवासी पुनर्विकास सदनिकांच्या उद्घाटनप्रसंगी मेहता बोलत होते. या कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सुनील शिंदे, खासदार राहुल शेवाळे, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे, नगरसेविका स्नेहल आंबेकर, पांचाळ, श्रद्धा जाधव आदी उपस्थित होते. 
 
बी. डी. डी. चाळींचे ऐतिहासिक महत्व विशद करतांना मेहता यांनी सांगितले की, बी. डी. डी. चाळीतील रहिवाशी ही मुंबईची खरी ओळख आहे, ही ओळख पुसता कामा नये. या रहिवाशांना पुनर्वसित मोफत सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय म्हणजेच शासनाने सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्ततेप्रति कटिबद्धता दर्शविली आहे. सुमारे तीन ते चार दशकांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता मात्र विद्यमान शासनाच्या यशस्वी प्रयत्नांनी हा प्रकल्प मार्गी लागला आहे. म्हाडाच्या विश्वासाहर्ततेचे परिमाण समोर ठेवता हा प्रकल्प यशस्वीरीत्या लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास मेहता यांनी व्यक्त केला. तसेच शिवडी येथील बी. डी. डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे करण्यात येत असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता असल्याचे मेहता यांनी सांगितले. 

५०० चौरस फुटाची सदनिका - 
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ एप्रिलला करण्यात आले. या प्रकल्पाचा आराखडा व नियोजन लक्षात घेता हा देशातील मोठ्या नागरी पुनरुत्थान प्रकल्पांपैकी एक ठरतो. बीडीडी चाळीतील पात्र निवासी भाडेकरूस ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची निवासी पुनर्विकास सदनिका मालकी तत्वावर मोफत दिली जाणार आहे. 

अशी असेल सदनिका -  नायगाव - दादर व ना. म. जोशी मार्ग - परळ येथील नमुना पुनर्विकास सदनिकेत लिविंग, डायनिंग, किचन, बेडरूम, मास्टर बेडरूम विथ अटॅच टॉयलेट, कॉमन टॉयलेट, पॅसेजचा समावेश आहे. या सदनिकेत व्हिट्रीफाइड टाइल्सचे फ्लोरिंग, किचनमध्ये अँटीस्किड टाइल्सचे फ्लोरिंग, सिंकसहित ग्रॅनाईट किचन ओटा, टॉयलेटमध्ये अँटीस्किड टाइल्सचे फ्लोरिंग, खिडक्यांना ऍनोडाईड सेक्शन, लिविंग रूम व बेडरूम यांना लाकडी फ्रेमचे आणि टॉयलेटसाठी मार्बलची फ्रेम असलेले दरवाजे यांचा समावेश आहे.

सात वर्षात प्रकल्प पूर्ण होईल - 
नायगाव - दादर येथील बीडीडी चाळ ६.४५ हेक्टरवर स्थित असून ३२८९ निवासी सदनिका असणाऱ्या या चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी मे. लार्सन अँड टुब्रो या बांधकाम एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ना. म. जोशी मार्ग - परळ येथील ५.४६ हेक्टर जमिनीवर स्थित बीडीडी चाळीत २५३६ निवासी सदनिका असून या चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी शापुरजी अँड पालनजी या बांधकाम एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या सात वर्षात टप्प्याटप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom