Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

रेल्वे तिकिटासाठी "क्युआर कोड"चा नवा पर्याय


मुंबई । प्रतिनिधी -
रेल्वे प्रवाशांना तिकीटासाठी ताटकाळत रांगेत उभे राहायला लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने यूटीएस मोबाईल अॅप सुरू केले आहे. या अॅपमध्ये प्रवाशांसाठी आणखी एक नवा पर्याय उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने म्हणजेच क्रिसने केला आहे. तिकीट काढण्यासाठी जीपीएस उपलब्ध होत नसेल तर रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या 'क्यूआर कोड'ला स्कॅन करुन तिकीट मिळवता येणार आहे.

मोबाईल तिकीटींगसाठीचा क्यूआर कोड हा एक नवा पर्याय आहे. सध्या या क्युआर कोडवर काम सुरू असून, दोन दिवसानंतर प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहीती क्रिसकडून देण्यात आली. हा क्यूआर कोड मध्य रेल्वेच्या ५ आणि पश्चिम रेल्वेच्या ५ रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडकीजवळ प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात येणार आहे. यूटीएस अॅपमध्ये स्कॅन क्यूआर कोड, असा पर्याय अॅप वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. अनेकदा जीपीएस नेटवर्क सिस्टिम चांगल्या पद्धतीने काम करत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात होती. त्यासाठीच रेल्वेने हा नवा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. मध्य रेल्वेच्या ५ स्थानकांच्या तिकीट खिडकीजवळ क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. सीएसएमटी, दादर, ठाणे, डोबिंवली आणि कल्याण या स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. यापैकी सीएसएमटी या स्थानकांत गुरुवारपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली या स्थानकांवर क्यू आर कोड लावण्यात येणार आहेत. तिकीट खिडक्यावरील रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी तसेच प्रवाशांना तात्काळ तिकीट उपलब्ध व्हावेत, यासाठी मोबाईल तिकीट सेवा मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात आली. दरम्यान, मोबाईलवर पेपरलेस तिकीटचाही पर्याय उपलब्ध करण्यात आला. या सेवेचा लाभ घेताना जीपीएस यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे.

'क्यूआर कोड' -
रेल्वे हद्दीत ३० मीटरपर्यंत असल्यास जीपीएस यंत्रणेद्वारे मोबाईल तिकीट काढता येते. मात्र, जीपीएस नेटवर्कची समस्या आल्यानंतर तिकिट खिडक्याजवळ उपलब्ध करुन दिलेल्या क्युआर कोडचा पर्याय देण्यात आल्याचे क्रिसचे (मुंबई विभाग) महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले. या जीपीएस नेटवर्कमध्ये समस्येपासून सुटका करण्यासाठी सुरुवातीला हा क्यु-आर कोड उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शिवाय, पेपरलेस मोबाईल तिकीट प्रणाली या संकल्पनेला आतापर्यंत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाईल तिकिटांना चांगला प्रतिसाद - 
मोबाईल तिकीट या संकल्पनेचा आतापर्यंत ७ लाख ५ हजार २३ प्रवाशांनी वापर केला आहे. मंगळवारी एका दिवसात मध्य रेल्वेवर ९ हजार ४१६ तिकीटांचे बुकींग करण्यात आले आहे. त्यात एकूण १२ हजार ५३१ प्रवासी होते. तर त्यातून १ लाख ४९ हजार रुपये एवढा फायदा मध्य रेल्वेला झाला आहे. तर, पश्चिम रेल्वेवर ७ हजार १५८ तिकीटांचं बुकींग करण्यात आले आहे. ९ हजार ९९८ प्रवाशांचा त्यात सहभाग होता. तर, त्यातून १ लाख २८ हजार रुपयांचा फायदा पश्चिम रेल्वेला झाला आहे. यात सिझन तिकीटांचाही समावेश आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom