शरद पवारांनीच एकबोटेंना पाठिशी घालण्याचं काम केलं - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

04 February 2018

शरद पवारांनीच एकबोटेंना पाठिशी घालण्याचं काम केलं - प्रकाश आंबेडकर


मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात सिमी आणि मिलिंद एकबोटेंच्या हिंदू एकता मोर्चा या दोन संघटनांवर बंदी घालण्यासंबंधीचा प्रस्ताव गृहविभागाने दिला होता. पण त्यावेळी शरद पवारांनीच एकबोटेंना पाठिशी घालण्याचं काम केलं, शरद पवार म्हणजे, मुहँ मे राम बगल मे छुरी असं काम करतात असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शरद पवार हे कारवाईचा अधिकार असतो त्यावेळी ते काहीच करत नाही आणि नंतर फक्त बोलतात, त्यामुळे आपण पवारांच्या राष्ट्रवादीसोबत कदापिही युती करणार नाही, म्हणूनच मी संविधान रॅलीपासून लांब राहणंच पसंत केलं, असे आंबेडकर यांनी सांगितले.

भारिप बहूजन महासंघाचा कार्यकर्ता मेळावा आज दादर येथील आंबेडकर भवन येथे पार पडला. या मेळाव्यात भारिप बहूजन महासंघाची केंद्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केला आहे. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, की २००१ मध्ये हिंदू - मुस्लिमांच्या दंगली मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या. त्यामध्ये पुणे हे केंद्र होते. पोलीस खात्यामार्फत दोन संघटनांना दोषी धरण्यात आले होते. त्यामध्ये सिमी या संघटनेवर बंदी घालण्यात आली आणि दुसरी संघटना म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलींद रमाकांत एकबोटे यांना दोषी धरण्यात आले होते. पुण्यामधील हिंदूकडून झालेल्या दंगली ह्या मिलींद रमाकांत एकबोटे यांनी घडविल्या असा ठपका ठेवण्यात आला होता. मिलींद एकबोटे यांच्या कारवाया आटोक्यात येत नसल्यामुळे त्यांना पुणे ग्रामीण पोलीस खात्याने एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करावे अशी शिफारस केली होती. ग्रामीण पोलीस खात्याच्या शिफारशीला पोलीस आयुक्तांनी नुसता दुजोरा दिला नाही, तर त्यांनी ती कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती केली. गृह खात्यातील सीआयडी विभागाने सुद्धा मंजुरी दिली. पोलीस महासंचालकांनी ही कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिले होते. या सर्व प्रकरणात स्थानबद्धतेची कारवाई पूर्ण व्हायची वेळ आली, त्यावेळी शरद पवार यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि ही कारवाई होण्यापासून थांबविली. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे आणि पुरावे हे प्रकाश आंबेडकर यांनी सादर केले आहेत. मिलींद एकबोटे यांना त्याचवेळी स्थानबद्ध केले असते, तर आज भीमा कोरेगावची दंगल झाली नसती. त्यामुळेच शरद पवार आणि त्यांच्या पक्षाशी कोणतेही राजकीय संबंध ठेवायचे नाहीत, अशी भूमिका भारिप बहूजन महासंघाच्या वतीने घेण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. देशातील अनियंत्रीत ज्या संघटना आहेत, त्या संघटनांचा देशात धुडगूस चालू आहे. मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवून आणली आहे. मिलींद एकबोटे यांना त्याचवेळी स्थानबद्ध केले असते, तर आज भीमा कोरेगावची दंगल झाली नसती. जातीच्या आणि धर्माच्या नावाने कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये, असे आवाहनही आंबेडकर यांनी यावेळी केले. जे कोणते पक्ष जातीच्या आणि धर्माच्या नावावर पाठिंबा देत असतील अशा पक्षांच्यासोबत आम्ही जाणार नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे आणि हिंदू महासभेचे काय संबंध आहेत, ते स्पष्ट करावे. त्यानंतरच माझ्याबद्दल बोलावे, अशी टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली.

डाव्यासोबत आघाडी - राज्यात डाव्यासोबत आघाडी करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. देशपातळीवर डाव्यासोबत आघाडी होऊ शकेल, की नाही हे माहिती नाही. पण राज्यात डाव्यासोबत आघाडी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post Top Ad

test