Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

राणीबागेतील प्रदर्शनात जलपरी आणि जलचर प्राणी अवतरणार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई जवळच्या समुद्रात 'डॉल्फिन' दिसणे तसे दुर्मीळच ! स्टारफिश, ऑक्टोपस, कासव यासारखे जलचर बघायचे झाले तर आपल्याला मत्स्यालयातच जावे लागते. मात्र आता याच जलचरांना जवळून अनुभवण्याची संधी महापालिकेच्या उद्यान प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे. महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या वार्षिक उद्यान प्रदर्शनात जलपरी, डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा, इत्यादींच्या फुलांपासून तयार केलेल्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रतिकृती ठेवण्यासाठी सुमारे १०० मीटर लांबीची एक कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून तिच्यात एक फुलांनी सजवलेला 'शिकारा' देखील असणार आहे. या प्रतिकृती आणि कृत्रिम नदी साकारण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागातील ४० कामगार – कर्मचारी - अधिकारी गेले तीन महिने दिवस रात्र मेहनत घेत आहेत, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे दरवर्षी साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात उद्यान विषयक प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनाचा शुभारंभ शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत, तर दि. १० व ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्यावर्षीपासून एक विषय घेऊन त्यावर आधारित पुष्परचना, वृक्षरचना विशेषत्वाने प्रदर्शित करण्यात येतात. या वर्षी जलप्रदुषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा (काश्मिरी पद्धतीची नाव) देखील या नदीमध्ये असणार आहे. यासोबतच डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा यासारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणा-या फुले, फळे व भाज्या याविषयीच्या वार्षिक प्रदर्शनाचे हे २३ वे वर्ष आहे. ९ फेब्रुवारी पासून सुरु होणा-या या प्रदर्शनात विविध प्रजातींची १० हजारांपेक्षा अधिक झाडे बघावयास मिळणार आहेत. यावर्षीच्या प्रदर्शनात परदेशी भाज्यांचे एक स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या विक्री विभागात ४० दालने उभारण्यात आली आहेत. या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी विक्रीस उपलब्ध असणार आहेत, अशीही माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. ज्यांना आपल्या घरी किंवा सोसायटीच्या अंगणात किंवा फार्म हाऊसमध्ये बाग फुलवायची आहे, त्यांना बागकामाची व झाडांची प्राथमिक व शास्त्रोक्त माहिती मिळावी, या उद्देशाने उद्यानाशी संबंधित १० वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळांचेही आयोजन प्रदर्शन कालाधीत करण्यात आले आहे. गेल्यावर्षी १३ ते १५ जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित झालेल्या प्रदर्शनाला १ लाख २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली होती. गेल्यावर्षीच्या प्रदर्शनात फुलांपासून तयार करण्यात आलेले मिकी माऊस, डोनाल्ड डक, डोरेमॉन इत्यादी 'कार्टुन कॅरेक्टर' लहानग्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू, तर मोठ्यांच्या स्मरणरंजनाचा (Nostalgia) विषय ठरले होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom