Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मेहूल चोकसीचे हिरे आणि राज्य मंत्रिमंडळातील ‘हिरे’ सारखेच - विखे पाटील


मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०१८:
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोकसीची ‘गितांजली जेम्स’ नामक कंपनी २-२ हजार रूपयांचे हिरे ‘ब्रॅंडिंग’ करून ५०-५० लाख रूपयांना विकत असे. त्या मेहूल चोकसीचे हिरे आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील‘हिरे’ सारखेच आहेत. त्याचाही कारभार फक्त‘ब्रॅंडिंग’वर होता. यांचाही कारभार फक्त‘ब्रॅंडिंग’वरच सुरू आहे. मात्र चोकसीच्या हिऱ्यांप्रमाणेच राज्यातील मंत्र्यांचाही ‘उजेड’काही पडत नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विरोधी पक्षनेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, विधानसभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, प्रतोद संजय दत्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते. तत्पूर्वी विधीमंडळातील सर्व गटनेत्यांची विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ‘मोदी’पॅटर्नच्या अपयशामुळे राज्यात ‘निरव’ शांतता आहे. साडेतीन वर्षात सरकारने अक्षम्य चुका केल्या असून, त्याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागला आहे. आपल्या सर्व पापांचे प्रायश्चित करण्याची व चूका सुधारून जनतेला न्याय देण्याची अर्थसंकल्पाच्या रूपात सरकारकडे शेवटची संधी असल्याचे ते म्हणाले.

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील नामक ८० वर्षीय शेतकऱ्याने विष घेण्याची घटना मंत्रालयाच्या इतिहासातील सर्वाधिक दुर्दैवी आहे. सरकारने ‘राजधर्म’ आणि ‘शेतकरी धर्म’पाळला नाही. त्यामुळे धर्मा पाटलांवर ही वेळ आली. धर्मा पाटलांचा मृत्यू ही आत्महत्या नव्हे, तर सरकार आणि सरकारच्या दलालांनी मिळून केलेला खून असल्याचा घणाघात विखे पाटील यांनी केला.

सरकारची तथाकथित ऐतिहासिक कर्जमाफी फसवी ठरल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. एक तर सर्व गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. शेतकऱ्यांना भरीव दिलासा मिळाला नाही. त्यामुळेच कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही २ हजार शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळल्याचे विखे पाटील पुढे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी ४० लाख थकबाकीदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच तो आकडा ३६ लाख १० हजार केला आणि सरकारी आकडेवारीनुसार ७ फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्षात केवळ १९ लाख २४ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला आहे, अशीही माहिती विखे पाटील यांनी दिली.

कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सरकारने आपली पाठ थोपटून घेणाऱ्या जाहिराती केल्या. त्यावर लक्षावधी रूपये खर्च केले. पण या जाहिरातींमध्ये सरकारने जाहीर केलेले आकडे आणि आज प्रत्यक्षात मिळालेली कर्जमाफी, यामध्ये प्रचंड तफावत आहे. सरकारच्या या खोट्या जाहिरातींसाठी शासकीय तिजोरीतून लाखो रूपये खर्च केल्यामुळे मुख्यमंत्री जनतेचे ‘डिफॉल्टर’ठरल्याची टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली

शिवसेनेने कर्जमाफीचे ८९ लाख लाभार्थी शेतकरी एक-एक करून मोजून घेण्याची वल्गना केली होती. पण आता मुख्यमंत्र्यांची आकडेवारी खोटी ठरल्यानंतर शिवसेनेने ८९ लाख शेतकरी मोजून घेतले आहेत का? की गणित कच्चे असल्याने त्यांना ८९ लाखांपर्यंत उजळणी येत नाही? असा टोला विखे पाटील यांनी लगावला. कर्जमाफी होत नाही म्हणून शिवसेनेने पूर्वी जिल्हा बॅंकेसमोर ढोल बडवले होते. आता त्यांचे ढोल फुटले की हात गळून पडले? असाही प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom