पशुवैद्यकीय सेवेसाठी अर्थसंकल्पात १४ कोटींची तरतूद - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

06 February 2018

पशुवैद्यकीय सेवेसाठी अर्थसंकल्पात १४ कोटींची तरतूद

मुंबई । प्रतिनिधी - 
महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात पाळीव प्राणी व भटकी जनावरे यांच्या आरोग्यासाठी परिमंडळीय स्तरावर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रारंभिक तरतूद (प्रातिनिधीक तरतूद) करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राण्यांपासून माणसांना होणा-या रोगांच्या निदानाकरिता (Zoonotic Diseases) अत्याधुनिक प्रयोगशाळेसह अद्ययावत निदानसुविधा असलेला प्राण्यांचा दवाखाना देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच देवनार पशुवधगृहाचे अत्याधुनिकीकरण, पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी इत्यादींबाबी देखील प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींसाठी रुपये १४ कोटी ५५ लाखांची प्रारंभिक तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

पशु आरोग्याशी मानवाचे आरोग्य निगडित असते. प्राण्यांमुळे माणसाच्या आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता असते. साधारणपणे माणसाला होणा-या आजारांपैकी ३०० हून अधिक आजार हे पशुचे निकृष्ट दर्जाचे मांस, निकृष्ट दर्जाचे प्राणीजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींपासून माणसाला होतात. प्राण्यांपासून माणसाला होणा-या आजारांना 'झूनॉटिक डिसिजेस' असे म्हटले जाते. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, रॅबीज, ऍन्थ्रॅक्स, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू यासारख्या आजारांचा समावेश होतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा विचार करताना पशुवैद्यकीय बाबींचा व पशुआरोग्याचा विचार करणे गरजेचे ठरते. वर्ष २०१२ मध्ये करण्यात आलेल्या एकोणिसाव्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ४० हजार ५९८ कुटुंबांमध्ये पाळीव प्राणी आहेत. ही संख्या वाढत्या शहरीकरणाबरोबर आणि वाढत्या लोकसंख्येसोबत वाढत आहे. या व्यतिरिक्त भटक्या जनावरांची संख्या देखील मोठी आहे. या पाळीव प्राण्यांच्या किंवा भटक्या जनावरांच्या आरोग्याच्या अनुषंगाने अथवा रोगांवर उपचार करण्यासाठी सध्या महापालिकेचा १ पशुवैद्यकीय दवाखाना असून तो खार परिसरात आहे. हा दवाखाना अद्ययावत करण्यासाठी आणि प्राण्यांपासून माणसांना होणा-या रोगांच्या (Zoonotic Deseases) निदानाकरिता प्रयोगशाळा उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजात रुपये १ कोटींची प्रारंभिक तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या खार येथील दवाखान्यासह महापालिका क्षेत्रातील खाजगी पशुवैद्यकांकडून पाळीव प्राण्यांवर आवश्यक ते उपचार केले जातात. पण या अनुषंगाने संसर्गजन्य आजारांबाबतची वा अन्य माहिती आवश्यक असल्यास महापालिकेकडे ठोस यंत्रणा नव्हती. ही बाब लक्षात घेऊन आता महापालिकेने पशुवैद्यकीय सेवांचे सुसूत्रीकरण करुन परिमंडळीय स्तरावर देखील पशुवैद्यकीय सेवा देण्याचे प्रस्तावित केले आहे. बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पशुवैद्यकीय सेवा प्रथमच परिमंडळीय स्तरावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सदर सेवे अंतर्गत मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी श्वान निर्बिजीकरण व नियंत्रण कार्यक्रमावर प्रत्यक्ष देखरेख, भटक्या श्वानांना रॅबीज प्रतिबंधक लसीकरण करणे, पाळीव श्वानांचा परवाना देणे इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये पशुवैद्यकीय संबंधित बाबींसाठी रुपये १४ कोटी ५५ लाखांची तरतूद विविध लेखाशीर्षांतर्गत करण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळीय स्तरावरील पशुवैद्यकीय सेवांसंबंधीत बाबी, पशुवैद्यकीय दवाखाना व प्रयोगशाळा, पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि देवनार पशुवधगृहाच्या अत्याधुनिकीकरणासाठी करण्यात आलेल्या प्रारंभिक तरतूदींचा समावेश आहे.

Post Top Ad

test