बेस्ट अर्थसंकल्प विलिनिकरणाविनाच महापालिका अर्थसंकल्प सादर होणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

01 February 2018

बेस्ट अर्थसंकल्प विलिनिकरणाविनाच महापालिका अर्थसंकल्प सादर होणार


मुंबई । अजेयकुमार जाधव -
बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. यासाठी बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरणास बेस्ट आणि महापालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र या विलिनीकरणास अद्याप राज्य सरकारची मान्यता मिळाली नाही. याकारणाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना बेस्टचा अर्थसंकल्प समावेश न करताच महापालिकेचा अर्थसंकल्प आज (शुक्रवारी २ फेब्रुवारीला) स्थायी समितीला सादर करावा लागणार आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन नसल्याने बेस्टची तूट भरून काढताना स्थायी समितीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टवरील कर्ज आणि आर्थिक अडचणी यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार देणेही उपक्रमाला शक्य नाही. अशा परिस्थतीत बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समिती व महापालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने आपल्या वचननाम्यात दोन्ही अर्थसंकल्प विलीन करण्याचे नमूद केले होते. त्यानुसार शिवसेनेची सत्ता असलेल्या बेस्ट समिती आणि महापालिकेत दोन्ही अर्थसंकल्प विलीन करण्यास ऑक्टोबरमध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र कायद्यात बदल करण्यासाठी लागणारी मंजुरी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अद्याप दिलेली नाही. 

महापालिकेत शिवसेनेचे तर राज्यात भाजपा, शिवसेनेचे सरकार आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासाठी गेल्या तीन महिन्यात मान्यता दिलेली नाही. यामुळे महापालिकेचे सन २०१८ - १९ चा अर्थसंकल्प बेस्टच्या अर्थसंकल्पाचा समावेश न करताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांना मांडावा लागणार आहे. बेस्टचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प ५६० कोटी रुपये तुटीचा तर सन २०१८ - १९ चा अर्थसंकल्प ८८० कोटी रुपये तुटीचा आहे. यातील सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प ५६० कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पाला महापालिका सभागृहाने नुकतीच मंजुरी दिली आहे. 

सन २०१८ - १९ च्या ८८० कोटींच्या तुटीमध्ये आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे बेस्ट समितीने अनेक सुधारणा केल्या आहेत. यामुळे ५०४ कोटीची तूट कमी होऊन ३७७ कोटी रुपयांची तूट राहणार आहे. मागील वर्षाची ५६० कोटी रुपयांची तर या वर्षीची ३७७ कोटी रुपयांची तूट पालिकेने अनुदानातून भरून काढावी अशी अपेक्षा बेस्टची आहे. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन झाला असता तर बेस्टची तूट भरून काढणे पालिकेला सहज शक्य होते. मात्र विलिनीकारणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून असल्याने महापालिकेच्या स्थायी समितीला बेस्टची तूट भरून काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०१७-१८ 
२५ हजार १४१ कोटी रुपये.. 

महापालिकेच्या विविध बँकांमध्ये ७१ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.. 

बेस्ट अर्थसंकल्प २०१८-१९
उत्पन्न ५४६१.३७ कोटी 
खर्च ५४६१.३५  कोटी 
तूट ८८०.८८ कोटी 
उपाययोजना ५०४.१८ कोटी 
अनुदान ३७६.७० कोटी 
शिल्लक १.७१ लाख 


राज्य सरकारने लक्ष द्यावे - 
शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारकची या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. राज्य सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. 
- यशवंत जाधव, सभागृह नेते, मुंबई महापालिका 

Post Top Ad

test
test