Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यभरात उद्यापासून कर्करोग जागृती पंधरवडा



मुंबई - जागतिक कर्करोग दिनानिमित्त उद्या ४ फेब्रुवारी पासून राज्यात ‘कर्करोग जागृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. याकाळात कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. येथील मालाड मालवणी भागातील सामान्य रुग्णालयात कर्करोग तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. उद्या जागतिक कर्करोग दिनापासून तेथे रुग्ण तपासणीस सुरुवात करण्यात येणार आहे.

प्राथमिक अवस्थेत मौखिक कर्करोगाचे निदान कर्करोग पूर्व लक्षणांमध्ये झाले तर कर्करोगाचा बरा होण्याचा दर 70 ते 75 टक्के आहे. हे लक्षात घेऊन राज्यात डिसेंबर 2017 मध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम आरोग्य विभागामार्फत टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राबविली.

या मोहिमेच्या पहिल्या 34 जिल्ह्यांमध्ये एक महत्वाच्या कालावधीमध्ये 2 कोटी 8 लाख 40 हजार 852 इतक्या लोकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. नाशिक मंडळात 26 टक्के, लातूर 8 टक्के, ठाणे 8 टक्के, औरंगाबाद 7 टक्के, अकोला 10 टक्के, पुणे 12 टक्के,कोल्हापूर 13 टक्के आणि नागपूर मंडळामार्फत 16 टक्के तपासणी केली.

21 ते 25 टक्के रुग्णांमध्ये मौखिक अस्वच्छता आढळून आली. त्यांना मौखिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यापैकी अंदाजित एक लाखापेक्षा जास्त संशयित प्रकरणे (पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंड न उघडता येणे व तोंडातील 15 दिवसांपेक्षा अधिक काळ असलेला व्रण) आढळून आली आहेत.

मोहिमेचा दुसरा टप्पा जानेवारी 2018 पासून सुरु झाला आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील संशयित रुग्णांची फेरतपासणी करुन त्यांच्या पूर्व कर्करोग व्रणांच्या ठिकाणाची बायोप्सी करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यामध्ये कर्करोगाचे निश्चित निदान केलेल्या रुग्णांना उपचार देण्यात येईल. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयांमध्ये जेथे कर्करोग उपचार सुविधा उपलब्ध आहेत, अशा रुग्णालयांची माहिती घेऊन तेथे अथवा नजीकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संशयित रुग्णांना संदर्भित केले जाईल.

नवीन उपक्रम - आरोग्यमंत्री
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने उद्यापासून राज्यात कर्करोग जागृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे. हा नवीन उपक्रम आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणामाबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तंबाखूमुक्त शाळेसाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर कॅन्सर वॉरिअर्सच्या माध्यमातून कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांनी कर्करोग पंधरवडा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे.

मुंबई येथील मालवणी सामान्य रुग्णालयात कर्करोग पूर्वनिदान तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या सहकार्याने व कॅन्सर वॉरिअर्स डॉक्टरांच्या आठवड्यातून दोन वेळा कर्करोग बाह्यरुग्ण तपासणी करण्यात येणार आहे.

कॅन्सर वॉरिअरबद्दल..
राज्यातील कॅन्सर वॉरिअरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कर्करोगाबद्दल जागरूकता व त्याचे निदान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. टाटा हॉस्पिटलमधून कर्करोगाचे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर जे सद्य:स्थितीत महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत अशा तज्ज्ञांनी ऐच्छिकरित्या महाराष्ट्र कॅन्सर वॉरिअर संघटनेची स्थापना केली आहे. त्यांनी टाटा मेमोरिअल हॉस्पीटलमधून कर्करोगाची वैद्यकीय पदवी घेतलेली आहे. अशा 57 कर्करोग तज्ज्ञ डॉक्टरांचा समूह संपूर्ण राज्यात गाव पातळीवरुन काम करत आहे. महाराष्ट्र कॅन्सर वॉरीअर्सच्या डॉक्टरांनी जिल्हास्तरावर रुग्णांना मोफत कर्करोग बाह्यरुग्ण विभाग, किमोथेरपी आणि शस्त्रक्रिया करण्याचा नवीन पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत जागरुकता निर्माण केली जात आहे.

कॅन्सर वॉरिअर्सनी 2016-17 मध्ये 24 जिल्ह्यांमध्ये 10 हजार 739 ओपीडी केसेस बघितल्या आहेत. तसेच सन 2016-17 मध्ये 400 कर्करोग शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तसेच एप्रिल 2017 ते डिसेंबर 2017 पर्यंत महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्सने 4862 ओपीडी व 2102 आयपीडी केसेस बघितल्या आहेत. तसेच 737 शस्त्रक्रिया केल्या आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom