कंत्राटदारांच्या कामाची गुणवत्ता दक्षता पथकाद्वारे तपासली जाणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेची कामे मिळवण्यासाठी कंत्राटदार ५० टक्क्याहून कमी दर नमूद करून निविदा मिळवतात. कमी रक्कमेत केलेल्या कामाचा दर्जा राखला जात नसून निकृष्ट दर्जाची कामी होत असतात. त्यामुळे ५० टक्क्याहून कमी दराच्या निविदा भरून कामे मिळवणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाची गुणवत्ता दक्षता पथकाद्वारे तपासण्याची मागणी भाजपा नगरसेवक संदीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारी केली होती. सदर ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजूर झाली असल्याने पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेची कामे करून घेताना, पालिकेच्या उपयोगी येणारी वस्तू किंवा एखादी वस्तू पुरवठा करताना नोंदणीकृत कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात येतात. आलेल्या निविदांमधून सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंत्राटदाराला काम दिले जाते. कंत्राटे मिळवण्यासाठी कंत्राटदारांमध्ये खूप चढाओढ असल्याने जास्तीत जास्त कमी किंम्मत नमूद करून कामे मिळवली जातात. सध्या कामाच्या अंदाजित दरापेक्षा ५० टक्क्याहून कमी दर नमूद केले जात आहेत. अशा वेळी कामाचा दर्जा राखला जात नसून निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. परिणामी करदात्यांकडून प्राप्त होणाऱ्या महसूलातून विकास कामांवर केला जाणारा खर्च वाया जाण्याची तसेच निकृष्ट कामांमुळे अपघात होऊन नागरिकांच्या जिवाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या विकास कामांवर दक्षता पथकाकडून पाहणी करण्यात येते, त्याचप्रमाणे ज्या कंत्राटदारांनी ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी दर नमूद करून कंत्राटे मिळवली आहेत त्यांच्या कामांवर दक्षता पथकाकडून निरीक्षण करून कामाची पूर्तता व गुणवत्ता तपासण्यात यावी. जेणेकरुन दक्षता पथकाच्या भितीने कामे गुणवत्तापूर्वक केली जातील व महापालिकेच्या महसुलाचे योग्य विनियोग करता येऊ शकतो असे संदीप पटेल यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले होते. पटेल यांची ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजुर झाली आहे. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी सदर सूचना पाठवण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर याबाबत पुढील कारवाई सुरु होईल. पटेल यांनी केलेली मागणी सभागृहाने मंजूर केल्याने निकृष्ठ कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबेदणाणले आहेत.
Tags