मुंबईतील शौचालये निशुल्क


मुंबई । प्रतिनिधी -
'पैसे भरा व वापरा' (Pay and Use Toilet) या संकल्पनेवर आधारित शौचालयांमधून नागरिकांकडून ठराविक दराने शुल्क न आकारात मनमानी पद्धतीने शुल्क आकारण्यात येते. याबाबत पालिकेकडे करण्यात आलेल्या तक्रारींची दखल पालिका आयुक्तांनी घेतली आहे. 'पैसे भरा व वापरा' ही संकल्पना मोडीत काढून शौचालये निशुल्क करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत.

'पैसे भरा व वापरा' (Pay and Use Toilet) या संकल्पनेवर आधारित शौचालयांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ही संकल्पना मोडीत काढून ही संबंधित शौचालये निशुल्क करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. सशुल्क शौचालय ही नागरिकांसाठी महापालिकेद्वारे देण्यात येणारी सेवा सुविधा आहे. या शौचालयांचा वापर सेवेच्या दृष्टीनेच व्हावा, तसेच सेवेच्या नावाखाली व्यवसाय केला जाऊ नये; याची काळजी घेण्याचे निर्देशही विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. शौचालये निशुल्क करण्याचे महापालिकेच्या वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात जाहीर केले आहे. सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा सशुल्क शौचालयांना स्वतः भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी. या पाहणी दरम्यान सदर ठिकाणी स्वच्छता नसेल, निर्धारित दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असेल किंवा शौचालयाचा नियमबाह्य वापर होत असेल; तर अशा शौचालयांना तात्काळ नोटीस देऊन ते ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेच्या वतीने उभारल्या जाणा-या शौचालयांचे आरेखन (Design) हे अधिक सुविधाजनक व उपलब्ध जागेचा अधिक परिणामकारक उपयोग करणारे असावे; यासाठी परिमंडळनिहाय एक वास्तूविशारद, याप्रमाणे वास्तूविशारदांचे एक पॅनेल तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. तसेच या पॅनेल्सद्वारे तयार करण्यात येणारे आरेखन हे जागेनुरुप व परिसरानुरुप असेल, याचीही काळजी घेण्याचे निर्देशित करण्यात आले.
Tags