पालिकेच्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातून बेस्टला खुश खबर मिळणार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईकर नागरिकांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेला बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. बेस्टला आर्थिक मदत करावी म्हणून सातत्याने मागणी केली जात आहे. बेस्ट उपक्रमावरील कर्जाचा डोंगर पाहता बेस्टला आर्थिक मदत करण्यास पालिकेकडून नकार दिला जात आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या सादर करण्यात येणाऱ्या सन २०१८ - १९ च्या अर्थसंकल्पात बेस्टला खुशखबर मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

बेस्ट उपक्रमाला २१०० कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. बेस्टला पालिका आणि विविध बँकांचे कर्ज परतफेड करावे लागते. यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देणेही बेस्टला शक्य होत नाही. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी संप केला होता. यावेळी कर्मचाऱ्यांची जबादारी पालिका घेईल असे घोषित करण्यात आले होते. पालिकेने बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत करावी म्हणून महापौर आणि पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत नेक बैठक झाल्या. त्यानंतर पालिका आयुक्तांनी बेस्टमध्ये सुधारणा करण्यास सांगितल्या. या सुधारणा केल्या तरच पालिका बेस्टला आर्थिक मदत करेल असे आयुक्तांकडून सांगण्यात आले होते.

बेस्टचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प ५६० कोटी रुपये तुटीचा सादर केला आहे. पालिका सभागृहाने या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. याचदरम्यान बेस्टचा सन २०१८ - १९ चा अर्थसंकल्प ८८० कोटी रुपये तुटीचा आर्टसहनकल्प सादर करण्यात आला. यात आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे सुधारणा केल्यावर ५०४ कोटीची तूट कमी होऊन ३७७ कोटी रुपयांची तूट राहणार आहे. या दोन्ही तुटीची भरपाई पालिकेने करण्यासाठी बेस्टला अनुदान द्यावे अशी मागणी शिवसेनेने केली असल्याची माहिती सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली. बेस्ट उपक्रमाला सन २०१७ - १८ च्या अर्थसंकल्पात पालिकेने निधी दिला नव्हता. नव्या बसगाड्या घेण्यासाठी निधी दिला नव्हता. मात्र पालिकेच्या सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात छोट्या साध्या व छोट्या एसी गाड्या घेण्यासाठी अनुदान दिले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Tags