हँकॉक पुलाच्या बांधकामासाठी ५१ कोटीचा खर्च - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 February 2018

हँकॉक पुलाच्या बांधकामासाठी ५१ कोटीचा खर्च

मुंबई । प्रतिनिधी - 
मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील हँकॉक पुल रहदारीसाठी असुरक्षित असल्याने २०१६ मध्ये पाडण्यात आला होता मात्र गेल्या दोन वर्षात याठिकाणी दुसरा पुल बांधण्यात पालिकेला अपयश आले आहे. मात्र पुलाच्या गैरसोयींमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत न्यायालयाने खडसावल्यावर पालिकेच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत पुलाच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. यासाठी पालिका ५१ कोटी रुपये खर्च करणार आहे.

हँकॉक पुल हा माझगाव मधील रहिवाशांना ये - जा करण्यासाठी उपयोगी होता. मध्य रेल्वेने हा पुल असुरक्षित असल्याचे जाहीर केल्याने ९ व १० जानेवारी २०१६ या दोन दिवसात पाडण्यात आला. रेल्वे व महापालिकेने पुल पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था केली नव्हती. तसेच पाडलेला पुल पुन्हा केव्हा बांधणार याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली गेली, न्यालयायला हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली. यावर न्यायालयाने पालिका व मध्य रेल्वेला फैलावर घेतले. यामुळे महापालिकेने पुलाच्या उभारणीसाठी निविदा मागविल्या होत्या. त्यास ४ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. यामध्ये मेसर्स साई प्रोजेक्ट्स प्रा. लि. ने सर्वात कमी खर्चात म्हणजे ३७ कोटी ९० लाख १४ हजार ५९६ रुपयांत १९ महिन्याच्या कालावधीत पुल उभारण्याचे संमती मान्य केले आहे. मात्र या कंत्राटाच्या खर्चात ४ टक्के सादिलावार, ८ टक्के टक्के पाणीपट्टी आकार, १० टक्के मलनि:सारण आकार, भूमिगत सेवा वळविणे, तांत्रिक सल्लागार व फेर तपासणी सल्लागार आदींचा खर्च पाहता या पुलाच्या उभारणीवर तब्बल ५१ कोटी ७० लाख १२ हजार ९२९ रुपये इतका खर्च केला जाणार आहे. पालिकेला या पुलाच्या बांधकामासाठी ३५ कोटी ७८ लाख रुपयांचा अंदाज अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्ष खर्च दीडपट जास्त होणार आहे. या पुलाची लांबी ६४.६२ मीटर, रुंदी ३०.०८ मीटर असून पुलाचे पृष्ठीकरण डीबीएम आणि मास्टिक अस्फाल्टचे असणार आहे. आर.सी.सी.वॉल टाईप पाईल्स पद्धतीचे या पुलाचे पायाचे बांधकाम असणार आहे. तसेच स्टील गर्डर व आर.सी.सी. डेक स्लॅब प्रकारचे बांधकाम असणार आहे.

Post Bottom Ad