Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

ब्रिटिशकालीन मैलाच्या दगडांचे जतन करण्यासाठी पालिका सल्लागाराची मदत घेणार


मुंबई | प्रतिनिधी - ब्रिटिश कालीन राजवटीत मुंबईत काही ठिकाणी मैलाचे दगड लावले होते. मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपणारे मैलाचे दगड शोधून त्यांचे पालिका जतन करणार आहे. त्यासाठी पुरातन वास्तू सल्लागाराची मदत घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

ब्रिटिश राजवटीत मुंबईत मैला-मैलावर रोवण्यात आलेले मैलाचे दगड (अंतर निर्देशक) काळबादेवी, ताडदेव, लोअर परेल, दादर, भायखळा आणि माझगावं या ठिकाणी अस्तित्वात आहेत. या दगडांवर मुंबईबाबतच्या क्षेत्रफळाची आणि इतर आवश्यक माहिती दर्शवली आहे. मात्र मुंबई शहराचा विकास करताना यापैकी काही दगडांचा थांगपत्ता लागलेला नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मुंबईचा हा ऐतिहासिक वारसा नष्ट होत चालला आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक मैलाचे दगड शोधून, त्यांना पुरातन वास्तूचा दर्जा देऊन पालिकेतर्फे त्याचे जतन करावे अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. या ठरावाला सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर ती पालिका आयुक्तांकडे अभिप्रायसाठी पाठविण्यात आली होती.

यासंदर्भातील प्रस्ताव विधी समितीपुढे आला असून आयुक्तांनी यावर अभिप्राय देताना म्हटले आहे की,ब्रिटिश राजवटीत मुंबई शहरात काळबादेवी, इब्राहिम रहीमतुल्ला रोड (युनियन बँक नळबाजार शाखा) डॉ. मस्करेन्हास रोड माझगाव, ऑगस्ट क्रांती मार्ग, भाटीया रुग्णालयासमोरील जावजी दादाजी मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग चिंचपोकळी पूल, ना.म.जोशी मार्ग चिंचपोकळी पूल, डॉ. एस एस राव मार्ग, साई ट्रेडर्ससमोर, ना.म.जोशी मार्ग इएसआयएस भवन समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग चित्रा सिनेमा समोर, एस.भोले. मार्ग अंथोनी डिसिल्व्हा शाळेसमोर, सायन, कर्नाटका बँकसमोर ,लेडी जमशेटजी रोड, वीर नरिमन रोड, पीडब्लूडी इमारतीचे बाहेरील प्रवेशद्वार, वीर नरिमन रोड मार्कर स्टोन या १५ ठिकाणी मैलाचे दगड अस्तित्वात होते. या मैलाच्या दगडांना मुंबई जतन वारसा समितीने ग्रेड -१ चा दर्जा दिला आहे.सदर मैलाच्या दगडांचा ऐतिहासिक दर्जा टिकून राहण्यासाठी त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्या अस्तित्वात असलेल्या मैलाच्या दगडांचे जतन, संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे प्रस्तावले आहे. हेरिटेज सुचिमधील १५ मैलाच्या दगडांपैकी ५ ठिकाणचे मैलाचे दगड कालाघोत नष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरीत १० मैलांचे दगड रस्ते व पदपंथांची उंची वाढल्यामुळे जमिनीत गाडले गेले. या १० दगडांपैकी एफ /दक्षिण विभागाने डॉ .एसएसराव मार्गावरील मैलाच्या दगडाचा अलीकडेच जीर्णोद्धार केला. जमीनीखाली गाडलेले व रासायनिक द्रव्ये व प्रदूषित हवेमुळे खराब झालेले हे दगड बाहेर काढून ते स्वच्छ करून त्याभोवतीचा परिसर कोबाल्ट स्टोन बसवून सुशोभीत करण्यात येईल .तसेच अस्तित्वात नसलेल्या दगडाची बेसॉल्ट दगडामध्ये अथवा अन्य टिकाऊ वस्तूमध्ये प्रतिकृती निर्माण करण्यात येईल. या कामासाठी पुरातन वास्तू सल्लागाराची मदत घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom