Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

रुग्णालय, दवाखान्याच्या बाळकटीकरणावर भर


पालिकेची आरोग्य सेवा महागणार -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालये आणि दवाखान्यांमधील उपकरणांचे व इतर आवश्यकतांचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात चांगली सेवा मिळत नसल्याने सायन, केईएम आणि नायर या महत्वाच्या रुग्णालयांवर रुग्णांचा भार पडतो. हा भार कमी करण्यासाठी उपनगरातील १० रुग्णालयांमध्ये औषधे, सामग्री व मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. एकीकडे रुग्णालये आणि दवाखाने यांचे बळकटीकरण करताना वैद्यकीय सेवांच्या दरामध्ये वाढ सुचवण्यात आली आहे. ही दरवाढ लवकरच लागू होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचा २०१८-२०१९ यावर्षीचा २७ हजार २५८ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केलाय. यात आरोग्य आणि वैद्यकीय सेवांसाठी ३६३६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सायन, केईएम आणि नायर या महत्वाच्या रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी उपनगरातील १० रुग्णालयांमध्ये औषधे, सामग्री व मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात ६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तीन आरोग्य केंद्रे, २५ दवाखाने व पाच प्रसुतिगृहांच्या दर्जोन्नतीचे काम यावर्षी हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ५०.७० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. टीबी व कृष्ठरोग रुग्णालयाच्या दुरुस्ती, यंत्रांसाठी, प्रयोगशाळांसाठी, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संसर्गजन्य, मधुमेह आणि उच्चरक्तदाब आजारांसाठी आवश्यक त्या उपकरणांनी दवाखाने सुसज्ज करण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात १.०५ कोटींची तरतूद केली आहे. केईएम, नायर, सायन व कूपर रुग्णालयामध्ये कॅथ लॅब उभारणीसाठी १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी पालिकेने रुग्णालयातील स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत बाबींच्या परीक्षणांसाठी फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. ९ स्मशानभूमीची दर्जोन्नती करण्यात येणार असून १२ स्मशानभूमींचे पीएनजी स्मशानभूमीत रूपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी २० कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

भांडुप येथे नवीन सुपरस्पेशालिटी रुगणालयाची उभारणीची घोषणा पालिकेने केली असली, तरीही त्यासाठी दहा लाख रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली आहे. कांदिवली येथील डॉ. आंबेडकर व विक्रोळी येथील म. फुले रुग्णालये अद्ययावत करण्यात येणार आहेत. वांद्रे येथील भाभा रुग्णालयाच्या पुनर्विकास योजनाही प्रस्तावित आहे. लो.टिळक रुग्णालयामध्ये १८०० खाटा उपलब्ध करण्यासाठी जुलै २०१८ पासून प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात एक नर्सिंग कॉलेज, निवासी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अशा तीन इमारतींच्या पुनर्विकासाची कामे समाविष्ट आहेत. केईएम रुग्णालयांमध्ये दोन बहुमजली टॉवर्सच्या उभारणीची योजना आहे. तर नायर रुग्णालयातील नऊ मजली इमारतीसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केईएम, लोकमान्य टिळक व नायर रुग्णालयासाठी वसतिगृहांच्या कामाला जीएसटीमुळे खीळ लागला होता. ही निविदा प्रक्रिया सुरू असून त्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयाची अकरा मजली नव्या इमारत उभारण्यात येणार आहे.

टीबीमुक्त मुंबई - 
संसर्गजन्य आजारामध्ये टीबीचे प्रमाण शहरात वाढते आहे. टीबीचे उच्चाटन करण्यासाठी पालिकेनेही पोषक आहार, रुग्ण प्रतिबंधक किट, लहान मुलांसाठी निदान केंद्र, कल्चर लॅब, विशेष आयआरसी युनिटचा समावेश टीबी नियंत्रित करण्यासाठी केला आहे. त्यासाठी १३.५० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

विशेष मुलांसाठी अर्ली इंटरव्हेंशन सेंटर - 
सार्वजनिक रुग्णालयांमध्ये विशेष मुलांसाठी आरोग्य उपचार दिले जात होते. मात्र या मुलांना समग्र वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी नायर रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली अर्ली इंटरव्हेंशन सेंटर प्रस्तावित आहे. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद आहे. जन्मजात व्यंग, वाढ खुंटणे, कमतरता, रोग या अनुषंगाने या मुलांची येथे तपासणी करण्यात येईल.

आरोग्य सेवा महागणार - 
मुंबई महापालिकेच्या आरोग्यविषयक सुविधांचे दर २००१ पासून सुधारण्यात आलेले नाहीत. अर्थसंकल्पात वैद्यकीय सेवांच्या दरात मुंबईतील रुग्णांसाठी २० टक्के तर मुंबई बाहेरील रुग्णांसाठी वैद्यकीय सेवांच्या दरात ३० टक्के वाढ सुचवण्यात आली आहे. दरवाढीला गटनेत्यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. पालिकेच्या समित्या व सभागृहाची मंजुरी मिळाल्यावर ही दरवाढ लागू केली जाणार आहे. जेष्ठ नागरिकांवर पूर्वीप्रमाणेच मोफत उपचार होणार आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom