Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

लेप्टोस्पायरेसीच्या जनजागृतीवरील खर्चाचा प्रस्ताव दिड वर्षांनी मंजुरीसाठी

मुंबई । प्रतिनिधी - 
सरकारी कार्यालयातील कामे कधीच वेळेवर होत नाहीत हे पुन्हा एकदा समोर आले आहे. देशात आणि राज्यात पारदर्शकता असावी म्हणून स्वच्छ कारभार करण्यावर भर दिला जात असताना श्रीमंत असलेली मुंबई महानगरपालिका मात्र याला अपवाद ठरत आहे. २०१६ मध्ये लेप्टोस्पायरेसिस या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी फिल्म बनवण्यात आली होती. यासाठी केलेल्या खर्चाच्या मंजुरीचा प्रस्ताव तब्बल दिड वर्षांनी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

लेप्टोस्पायरेसिस हा आजार प्राण्यांच्या मलमूत्रामुळे होतो. साचलेल्या पाण्यात एखाद्या संसर्गित प्राण्याचे मलमूत्र मिसळले व त्या पाण्याशी एखाद्या व्यक्तीची जखम संपर्कात आल्यास त्या व्यक्तीला लेप्टोस्पायरेसिस हा आजार होतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास ती व्यक्ती या आजारपणामुळे दगावते. त्यामुळे नागरिकांनी, पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाणे शक्यतो टाळावे किंवा गमबुटांचा वापर करावा, असे आवाहन या जनजागृतीपर फिल्ममध्ये करण्यात आले होते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्सीसायक्लिन हे औषध घेतल्यास लेप्टोच्या आजाराला प्रतिबंध करता येतो, असे या फिल्ममध्ये दखविण्यात आले होते. जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेली ४५ सेकंदाची फिल्म शासनमान्य यु.एफ.ओ. डिजिटल सिनेमा या संस्थेमार्फत मुंबईतील १०१ सिनेमागृहात सॅटेलाईटद्वारे १९ ऑगस्ट २०१६ ते २८ ऑगस्ट २०१६ या कालावधीत दाखविण्यात आली. दररोज ४ शो याप्रमाणे १० दिवस ही फिल्म नागरिकांना दाखविण्यात आली. त्यासाठी पालिकेने २ लाख ८२ हजार ५५५ रुपये खर्च केले. पालिकेने जी रक्कम २०१६ मध्ये खर्च केली आहे त्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी लवकरात लवकर मंजुरीसाठी पाठवण्याचा नियम आहे. मात्र नियम धाब्यावर बसवत तब्बल दिड वर्षांनी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. यामुळे स्थायी समितीत राजकीय पक्ष प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom