Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

दोन शिक्षकांचे महापौर पुरस्कार अडचणीत


मुंबई । प्रतिनिधी -
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५० शिक्षकांना मुंबई महापालिकेतर्फे महापौर शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. मात्र या पुरस्करासाठी गंभीर आरोप असलेल्या दोन शिक्षकांची निवड करण्यात आल्याने निवड पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गंभीर आरोप असलेल्या दोन शिक्षकांना पुरस्कार देण्यास माध्यमिक शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे गोविंद ढवळे आणि पालकांनी आक्षेप घेला आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशीचे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत. 

महापौर पुरस्कार गुणवंत शिक्षकांना जाहीर होण्यापूर्वीच शिक्षक - शिक्षकेतर सेनेतर्फे शिक्षण समिती अध्यक्ष, शिक्षण अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती; मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. यामुळे पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत वादग्रस्त शिक्षक सुभाष वाघमारे व सुरेश आभाळे यांचे नाव समाविष्ठ करण्यात आले. सुभाष वाघमारे घाटकोपर येथील बर्वेनगर शाळेत नोकरी करत असले तरी शिकवण्यासाठी कधीही वेळेवर उपस्थित राहत नसत, बोगस बिलांचा वापर, विद्यार्थ्याना गणवेश दिलेले नाहीत, मुख्याध्यापकांचे ते नियमबाह्य पीए होते त्यांच्या विरोधात अनेक आरोप असतानाही व ते एका प्रकरणात दोषी आढळले तरी त्यांची निवड महापौर पुरस्कारासाठी कशी काय करण्यात आली, असा सवाल गोविंद ढवळे यांनी विचारला आहे. 

तसेच दुसरे शिक्षक सुरेश आभाळे यांच्यावरही त्यांची नेमणूक भ्रष्ट मार्गाने झाली, त्यांचे सेवासातत्य नव्हते, ते वरिष्ठांची मर्जी जास्त सांभाळत असल्याने त्यांचे कामाकडे दुर्लक्ष होते. असे आरोप असलेल्या शिक्षकांना महापौर शिक्षक पुरस्कार कसा काय जाहीर झाला असा प्रश्न शिक्षक - शिक्षकेतर सेनेतर्फे विचारण्यात आला आहे, दरम्यान महापौर पुरस्कार हे गुणवंत शिक्षकांनाच दिले पाहिजेत, आरोप असणाऱ्यांना नाही. त्यामुळे महापौर पुरस्कार विकले जातात का, असा प्रश्न गोविंद ढवळे यांनी यांनी विचारला आहे. या दोन्ही शिक्षकांचे महापौर पुरस्कार रद्द करावेत अशी मागणीही ढवळे यांनी केली आहे. यापूर्वीही, २००९ मध्ये अशाच प्रकारे एका शिक्षकाला जाहीर झालेला पुरस्कार आरोप झाल्यानंतर व चौकशीअंती रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे आवाहन ढवळे यांनी केले आहे. ८ फेब्रुवारीला महापौर शिक्षक पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. त्याआधीच या दोन शिक्षकांबाबत तक्रारी आल्याने त्याची गंभीर दखल घेत आरोपांची चौकशी झाल्याशिवाय त्यांना पुरस्कार दिले जाणार नाहीत, असे आश्वासन महापौर महाडेश्वर यांनी दिल्याचे गोविंद ढवळे यांनी पत्रकारांना सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom