राज्य सरकार विरोधात पालिका आयुक्तांनी दंड थोपटले - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 February 2018

राज्य सरकार विरोधात पालिका आयुक्तांनी दंड थोपटले


मुंबई | प्रतिनिधी -
महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार असल्याने महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाचा प्रश्न निर्मांण झाला आहे. महापौरांच्या पर्यायी निवासस्थानासाठी मलबार हिल येथील पालिकेच्या जल अभियंत्यांच्या बंगल्याची मागणी केली जात आहे. जल अभियंत्याचा बंगला ताब्यात घेण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. या बंगल्यात सनदी अधिकारी राहत असल्याने हा बंगला खाली करू नये असे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्देशविरोधात पालिका आयुक्तांनी बन्गला खाली करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापौरांचे निवासस्थान असलेल्या महापौर बंगल्याबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी महापौरांना पर्यायी निवासस्थान उपलब्ध करावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. महापौरांनी भायखळा येथील राणीबागेतील बंगला नाकारला आहे. मलबार हिल येथील पालिकेचा बंगला महापौरांच्या निवासस्थानासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. मलबार हिल येथील पालिकेच्या बंगल्यात पालिकेच्या सेवेत नसलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा मुक्काम आहे. महापौरांच्या निवासस्थानासाठी काय कार्यवाही केली याचा अहवाल तातडीने सादर करा असे निर्देश सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी प्रशासनाला दिले आहेत. पालिकेच्या मलबार हिल येथील जल अभियंत्यांच्या बंगल्यात माजी अतिरिक्त आयुक्त व सनदी अधिकारी पल्लवी दराडे व त्यांचे पती सनदी अधिकारी प्रवीण दराडे हे दांपत्य वास्तव्य करीत आहेत. त्यांना अनेक वेळा नोटिस देऊनही बंगला खाली करण्यात आलेला नाही. याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाला पत्र लिहून पालिकेचे बंगले बाहेरील अधिकाऱयांना देण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महापौर निवासाचा विषय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला आणावा अशी मागणी रवी राजा यांनी केली होती. मलबार हिल येथील बंगल्यामधून दराडे यांना बाहेर कडून नये असे स्पष्ट पत्र पालिका आयुक्तांना सामान्य प्रशासनाकडून ऑक्टोबर २०१७ मध्ये पाठवण्यात आले आहे. दराडे हे पालिकेच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर आलेले अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांना हा बंगला देण्यात आलेला आहे. ते या सेवेत असे पर्यंत त्यांच्याकडून बंगला काढू नये तसेच बंगल्याच्या भाडयासाठी दुप्पट रक्कम आकारू नये असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आलेले आहेत. याबाबत ३१ डिसेंबर २०१४ मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय जल अभियंत्यांचा बंगला खाली करण्यासाठी नोटीस देऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत आज झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत महापौरांच्या निवासासासाठी दराडे रहात असलेला बंगला खाली करावा अशी मागणी सात्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. राज्य सरकारकडून आलेल्या पत्राबाबत या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. यावर काहीही झाले तरी मलबार हिल येथील बंगला खाली करणार असल्याची भूमिका आयुक्तांनी जाहीर केली. बंगल्याला असलेली पालिकेची सुरक्षा काढून घेण्यात येणार आहे. दराडे यांच्याकडून पाणी आणि लाईट बिलाची रक्कम वसूल केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी गटनेत्यांच्या बैठकीत दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान ज्या राज्य सरकारने अजोय मेहता यांना पालिका आयुक्त म्हणून नेमणू केली त्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेणारे मेहता खरोखरच मलबार हिल येथील बांगला खाली करतात का हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे. 

Post Bottom Ad