मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेकडून मोठे फेरबदल - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

15 February 2018

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेकडून मोठे फेरबदल

सातमकर, चेंबूरकर यांचे स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे  
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने पालिकेमधील अनेक पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एका भाग म्हणून शिवसेनेचे जेष्ठ सदस्य असलेले नगरसेवक मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. सातमकर आणि चेंबूरकर यांच्या अनुभवाचा वापर करून पालिका प्रशासनावर आपला वचक वाढवण्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक व नेते यशवंत जाधव यांना महापौर बनवले जाईल असे अंदाज वर्तवले जात होते मात्र यशवंत जाधव यांच्या गळ्यात सभागृह नेतेपदाची माळ टाकण्यात आली. जाधव हे सभागृह नेते झाल्यावर महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मंगेश सातमकर यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र शेवटच्या क्षणाला रमेश कोरगांवकर यांची स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सातमकर यांच्या प्रमाणेच जेष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर यांचेही नाव स्थायी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. त्यांनाही त्यावेळी अध्यक्ष पद मिळालेले नव्हते. स्थायी समिती अध्यक्षपद हुकल्याने सातमकर, चेंबूरकर नाराज होते. कोरगावकर यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्यावर सातमकर व चेंबूरकर यांना स्थायी समिती सदस्य बनवण्यात आले होते. स्थायी समितीच्या बैठकीत अनेकवेळा या दोघांनी रोखठोक भूमिका घेत प्रशासनाला जेरीस आणले होते. याचवेळी शिवसेनेची सत्ता पालिकेत असताना इतर समित्यांवर मात्र आपली छाप पाडता आली नव्हती. यामुळे या दोघांकडून स्थायी समितीसदस्य पदाचा राजीनामा घेत या दोघांच्या अनुभवाचा वापर इतर समित्यांच्या कामकाजांसाठी करून प्रशासनावर आपली पकड घट्ट करण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. मंगेश सातमकर यांना शिक्षण समिती अध्यक्ष तर आशिष चेंबूरकर यांना बेस्ट समिती अध्यक्षपद दिले जाणार आहे. शिक्षण समिती अध्यक्ष स्थयी समितीचा पदसिद्ध सदस्य असल्याने सातमकर शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून स्थायी समितीत येणार आहेत. पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदावरही नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.  

Post Top Ad

test