Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

घाटकोपरमध्ये नाराज शिवसैनिकांची पोस्टरबाजी


मुंबई । प्रतिनिधी -
शिवसेनेमध्ये बाहेरून आलेल्या कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांना पदे दिली जात असल्याने शिवसैनिकांमधील वाद उफाळून आला आहे. हा वाद आता विकोपाला गेला असून शिवसैनिकांनी पोस्टर लावून याबाबत जाहिर नाराजी व्यक्त केली आहे. मनसे कार्यकर्त्यांना घेण्यापेक्षा राज ठाकरे यांनाच शिवसेनेत का घेत नाही ? असा खडा सवाल बॅनरबाजीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी केला आहे.

ईशान्य मुंबई शिवसेनेत बाहेरुन पक्षात आलेल्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज असल्याचे उघड झाले आहे. ईशान्य मुंबईची 'नवनिर्माण शिवसेना' असे नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनरबाजी केली आहे. 'शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरं फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असे म्हणत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी मुंबई विभाग क्र.८ च्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. मात्र या यादीत नियुक्त्या करण्यात आलेले अनेक जण हे अनेक पक्ष फिरुन आले आहेत. याचा अर्थ असा होतो, की शिवसेनेतील निष्ठावंत पदाच्या लायकीचे राहिलेले नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला आहे. घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक १२९ च्या बाहेर दोन दिवसांपूर्वी शिवसैनिक आपसात भिडले होते. प्रदीप मांडवकर हे गेल्या सहा वर्षांपासून विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र नव्या नियुक्त्यांनंतर शिवाजी कदम यांची शाखाप्रमुख पदावर निवड झाली. कदम यांनी वर्षभरापूर्वीच मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवाय त्यांचे वय ६५ असल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत. याच नाराजीमुळे मांडवकर आणि कदम यांच्या गटात भांडण झाले होते. यानंतर शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये होर्डिंगतून ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?’ अशी खोचक टीका करुन शिवसैनिकांनी सेनेला घरचा आहेर दिला आहे.

काय लिहिलेय पोस्टरवर - 
ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. ८ च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?

पदाधिकाऱ्यांची सध्याची पदे व पूर्वीचे पक्ष -
मा. बाबू दरेकर (उपविभागप्रमुख) - पूर्वी - मनसे
मा. विजय पडवळ (उपविभागप्रमुख)- पूर्वी - मनसे भाजप
मा. ज्ञानेश्वर वायाळ (विधानसभा संघटक) - पूर्वी - मनसे
मा. बाबू साळुंखे (शाखाप्रमुख) - पूर्वी - मनसे/राणे समर्थक
मा. शिवाजी कदम (वय वर्ष 65 शाखाप्रमुख) पूर्वी - मनसे
मा. नाना ताटेले (शाखाप्रमुख) - पूर्वी - राष्ट्रवादी-मनसे-भाजप
मा. शरद कोथरे (शाखाप्रमुख) - पूर्वी – मनसे

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom