त्या सहा नगरसेवकांचा चार महिन्यानंतर सभागृहात प्रवेश - शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन


मुंबई | प्रतिनिधी -
मनसेच्या सहा नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर या नगरसेवकांनी स्थापन केलेल्या गटाला मान्यता देऊ नये अशी तक्रार कोंकण आयुक्तांकडे करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल नुकताच या नगरसेवकांच्या बाजूने लागला आहे. यामुळे आज पालिका सभागृहात या सहा नगरसेवकांसह शिवसनेच्या नगरसेवकांनी भगवे फेटे घालून, शिसवसेनेचा जयजयकार करत पालिका सभागृहात शक्तीप्रदर्शन केले.

मागील वर्षीच्या 13 ऑक्टोबरला मनसेच्या सात पैकी दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून मनसेसह भाजपलाही जोरदार धक्का दिला. मात्र वेगऴा गट स्थापन करून शिवसेनेत अधिकृत प्रवेश करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांची मान्यता मिळणे आवश्यक होते. मात्र याचवेळी मनसेने आयुक्तांकडे तक्रार करून या सहा नगरसेवकांच्या गटाला मान्यता न देता त्यांचे पद रद्द करा, त्यांना कोणत्याही समित्यांच्या बैठकांना बसू देऊ नये अशी तक्रार करण्यात आल्याने त्यांचा पक्षप्रवेश मागील चार महिन्यांपासून रखडला होता. या सहा नगरसेवकांच्या शिवसेनेत प्रवेशावर काही दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी शिवसेनेच्या 93 नगरसेवकांच्या गटाला मान्यता दिली. तसे पत्र कोंकण आयुक्तांनी पालिकेला पाठवल्याने पालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तशी घोषणा केली होती. यामुले शिवसेनेचे संख्याबळ 87 वरून 93 झाले आहे. या सहाही नगरसेवकांच्या बाजूने निर्णय लागल्याने त्यांचा पालिका सभागृहात व विविध समित्यांमध्ये बसण्याचा मार्ग मोकळा झाला होता. गुरुवारी पालिका सभागृहात मनसेमधून आलेल्या नगरसेवकांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी भगवे फेटे घालून सभागृहात शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शिवसेना जिंदाबाद, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला इत्यादी घोषणा देण्यात आल्या.
Tags