रेल्‍वे हद्दीत वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांना परवानगी द्या - अॅड आशिष शेलार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईसह राज्‍यात रेल्‍वे हद्दीत वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांना परवानगी देण्‍यात यावी अशी पुन्‍हा मागणी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी रेल्‍वे मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे.

मुंबईसह राज्‍यातील रेल्‍वे हद्दीतील वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांवर फेरिवाल्‍यांसोबतच कारवाई करण्‍यात येते या विक्रेत्‍यांचे मोठे नुकसान दरवेळी होते. याबाबत शेलार सतत पाठपुरवा करीत असून यापुर्वीही रेल्‍वे मंत्र्यांची भेट घेऊन कारवाई करण्‍यात येऊ नये, अशी विनंती केली होती. तसेच वृतपत्र विक्रेता हा वृतपत्राच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचा घटक असल्‍यामुळे याबाबतची लक्षवेधी नागपूर अधिवेशनात शेलार यांनी उपस्थित केली होती तसेच मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिका हद्दीतील विक्रेत्‍यांना त्‍यांनी न्‍याय मिळवून दिला. त्‍याच प्रमाणे आता रेल्‍वे हद्दीतील विक्रेत्‍यांनाही रेल्‍वेने परवानगी द्यावी अशी मागणी ते करीत आहेत. आज नवी दिल्‍ली येथे जाऊन पियुष गोयल यांची भेट घेऊन याबाबतची विनंती त्‍यांनी पुन्‍हा एकदा केली आहे.
Tags