आदिवासी आश्रमशाळेत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही सुरु - विष्णू सवरा


मुंबई - राज्यातील आदिवासी आश्रमशाळेत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही सुरु आहे. वसतिगृहाचे प्रवेशद्वार, भोजनगृह, स्वच्छता गृह या ठिकाणी ही यंत्रणा बसविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यासंदर्भात सदस्य विरेंद्र जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सवरा म्हणाले, अपर आयुक्त स्तरावर चार ठिकाणांहून ही कार्यवाही करण्यात येत आहे. राज्यात शासकीय आश्रमशाळांची संख्या 510 असून त्यापैकी 128 ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. 542 खाजगी अनुदानित आश्रमशाळा असून त्यापैकी 315 ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित आहे. तर 490 वसतीगृह असून त्यापैकी 188 ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. सीसीटीव्ही बसविण्याचे निकष ठरविताना ते शाळेच्या प्रवेशद्वारावर संपूर्ण इमारतीचा समावेश होईल अशा ठिकाणी तसेच वसतीगृहाचे प्रवेशद्वार त्याची मागची व पुढची बाजू, भोजनगृह अशा ठिकाणी ही यंत्रणा लावण्याचे क्षेत्रिय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृहांच्या बाहेर सीसीटीव्ही लावण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य वैभव पिचड, डी.एस. आहिरे, डॉ. भारती लव्हेकर, जयदत्त क्षिरसागर यांनी भाग घेतला.
Previous Post Next Post