Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बेस्ट उपक्रमाचे खासगीकरण नाही - महाव्यवस्थापक

कर्मचाऱ्यांना १५ तारखेच्या आत पगार -
मुंबई । प्रतिनिधी -
बेस्ट उपक्रमाचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण होणार नाही तसेच कामगारांनाही कमी करण्यात येणार नाही. त्यामुळे कामगारांनी भीती बाळगू नये, असे सांगतानाच बेस्ट कामगारांना फेब्रुवारी महिन्याचे वेतन १५ मार्चपर्यंत देण्यात येईल, असे आश्वासन बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी आज बेस्ट समितीच्या बैठकीत दिले. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बेस्टच्या ताफ्यात खासगी भाडेतत्त्वावरील बस दाखल होत असल्यामुळे बेस्टचे खासगीकरण होत असल्याची भीती कामगार संघटनांसह राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. मात्र, बेस्ट उपक्रमाचे खासगीकरण होणार नसल्याचा खुलासा बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी केला आहे. बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असल्याने नव्या बसेस खरेदी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पुरेसा निधी नाही. त्यातच महापालिका आयुक्तांनी केलेल्या सुचनांनुसार बेस्टमध्ये भाडेतत्वावरील ४५० बसेस घेण्यात येणार आहेत. या खासगी बस कुठे चालवाव्यात हा अधिकार संपुर्णपणे बेस्टचा राहणार असल्याचेही बागडे यांनी स्पष्ट केले आहे. बसचा वाहकही बेस्टचाच राहणार असल्यामुळे खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. काही लोक खासगीकरणाच्या नावाने आरडाओरड करुन कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत बागडे यांनी केला. बेस्टमध्ये सध्या कार्यरत असणा‍ऱ्या एकाही कर्मचाऱ्याला नोकरीवरून कमी करणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी चिंता करू नये, असे आवाहनही बागडे यांनी यावेळी केले. नैराश्य येण्याइतकी बेस्टची वाईट परिस्थिती नाही. ती केवळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होत असल्याचेही बागडे यांनी झालेल्या बैठकीत सांगितले.

कर्मचाऱ्यांना १५ तारखेच्या आत पगार - 
बेस्ट कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यात पगार वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. फेब्रुवारीचा पगार १३ तारीख उठून गेली तरी अद्याप झालेला नाही. याच्या निषेधार्थ भाजपाचे बेस्ट समिती सदस्य असे सुनील गणाचार्य यांनी सभा तहकुबीची सुचना मांडली. याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. यावर बोलताना शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी बेस्ट वाचविण्याची महाव्यवस्थापकांची इच्छा नसेल तर बेस्टचे गाडे ओढता कशाला? असा प्रश्न उपस्थित करत महाव्यवस्थापकांनी बेस्टमधून निघून जाण्याचे आवाहन केले. तर शिवसेनेचे सदस्य अनिल पाटणकर यांनी बेस्टची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. यानंतर महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी १५ मार्चपर्यंत पगार देण्याचे आश्वासन दिले. बेस्टच्या तिजोरीत १० तारखेपर्यंत पैसे जमा झाल्यास कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेलाच पगार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही बागडे यांनी यावेळी स्पष्ट केले. महाव्यस्थापकांच्या खुलाश्यानंतर बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी गणाचार्य यांना सभातहकुबी मागे घेण्याची विनंती केल्यावर गणाचार्य यांनी सभातहकूबीची सूचना मागे घेतली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom