'ऑनलाईन' आरोग्य परवाना आता ३० दिवसात मिळणार

JPN NEWS

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेकडून विविध आस्थापनांना आरोग्य परवाने दिले जातात. यात उपहारगृहे, बेकरी, खाद्यपदार्थ विक्रेते, लॉज, पिठाची गिरणी, तेल-तुप विक्रेते यासारख्या विविध ३५ व्यवसायांचा समावेश आहे. या आस्थापनांना लागणारे परवाने आता ऑनलाईन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अर्ज केल्यापासून ३० दिवसांत परवाने उपलब्ध होतील, असा दावा महापालिकेने केला आहे.

मुंबईत विविध ३५ व्यवसायांसाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचा आरोग्य परवाना आवश्यक असतो. यामुळे पालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यात अर्ज करण्यासाठी अर्जदाराला 'पॅन कार्ड' स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. याचबरोबर भ्रमणध्वनी क्रमांक व इमेल आयडी, आरोग्य परवान्यातील अटी व अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून करावयाच्या अटींची पूर्तता निर्धारित वेळेत पूर्ण करावी लागणार आहे. या अटींच्या पूर्ततेबाबत सार्वजनिक आरोग्य खाते आणि मुंबई अग्निशमन दलामार्फत स्वतंत्रपणे तपासणी केली जाईल. तर इमारतींची तपासणी 'इमारत व कारखाने' या खात्याद्वारे करण्यात येईल. प्रत्येक परवान्यासाठी प्रक्रिया शुल्क रुपये २०० फी असून ती ऑनलाईन भरता येणार आहे. ३० दिवसांत अर्ज प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सदर अर्ज प्रक्रिया आपोआप रद्द होईल. त्यानंतर अर्जदाराला नव्याने अर्ज करावा लागेल. तर अर्ज योग्यरित्या भरला आहे की नाही याची खातरजमा वैद्यकीय आरोग्य अधिका-यांकडून केली जाईल. मात्र अर्ज योग्यरितीने भरलेला नसल्यास त्याची माहिती अर्जदारास ३ दिवसांच्या आत इमेलद्वारे कळविणे वैद्यकीय आरोग्य अधिका-यांना बंधनकारक आहे. तर इमारत व कारखाने खात्याच्या अधिका-यांनी १० दिवसांच्या आत रिमार्क वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे. यामध्ये संबंधित इमारतीवर काही कारवाई प्रलंबित आहे का, इमारत धोकादायक नाही ना आणि ज्या ठिकाणी आस्थापना सुरु करावयाची आहे, ती जागा व्यवसायिक जागा आहे ना याची खातरजमा करणे बंधनकारक आहे. मात्र १० दिवसांत रिमार्क न दिल्यास आणि आरोग्य विभागाने परवाना दिल्यास याबाबतची जबाबदारी इमारत व कारखाने खात्याची असणार आहे. तसेच ऑनलाईन आरोग्य परवाना प्रक्रियेत ५ वर्षांचे शुल्क एकाच वेळी भरता येणार आहे. त्यामुळे दरवर्षाऐवजी ५ वर्षातून एकदाच परवाना नूतनीकरण करता येईल.

अग्निसुरक्षा तपासणी - 
अग्निसुरक्षा विषयक तपासणी 'फायर कंम्प्लायन्स ऑफीसर' यांच्याद्वारे केली जाईल. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यापुढील ७ कार्यालयीन दिवसांत 'फायर कंम्प्लायन्स ऑफीसर' जागेला प्रत्यक्ष भेट देऊन, तपासणी करुन आपला अहवाल कळवतील. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कर्मचा-यांनी देखील सदर जागेची आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून तपासणी करावयाची आहे. यानंतर अर्ज वैद्यकीय आरोग्य अधिका-यांकडून उप कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे आणि त्यानंतर संबंधित'वॉर्ड ऑफीस'च्या सहाय्यक आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परवाना केवळ आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून देण्यात आला असून तो जागेच्या अधिकृततेशी संबंधित नाही. परवाना सध्या लागू आहे अथवा नाही?याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याकडून मिळेल. परवाना दिल्यानंतर कोणत्याही तपासणी दरम्यान सदर जागा अग्निसुरक्षेच्यादृष्टीने योग्य नसल्याचे आढळून आल्यास परवाना तात्काळ रद्द होईल, अशा अटी शर्ती घालण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
Tags