Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पुरुषाच्या खांदयाला-खांदा नव्हे तर काकण भर पुढेच राहू

मुंबई महापालिकेतर्फे जागतिक महिला दिन संपन्न -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेतर्फे बचत गटाच्या मार्फत सर्वत्र बचत गटाचे जाळे विणले गेले असून त्यांच्यातर्फे मुंबई शहराला सक्षम करण्याचे काम सुरु आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने महिलांचा वावर पुरुषाच्या खांदयाला-खांदा नव्हे तर काकण भर पुढेच राहू असा संकल्प जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात करण्यात आला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महिला दिन आहे म्हणून महिलांचा सन्मान नको, तर प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक ठिकाणी महिलांचा मान राखला जावा असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “महिलांसाठी घडवूया सुरक्षित मुंबई” व “स्वायत्त नागरी संस्थामधील महिलांचा सहभाग” या परिसंवाद सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि न्यायिक क्षेत्रातील नामांकित तज्ञांनी सहभाग घेतल्याने परिसंवादातील चर्चा मुंबई शहरासाठी ऐतिहासिक ठरली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विधी खाते व सहाय्य्क आयुक्त (नियोजन) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “महिलांसाठी घडवू या सुरक्षित मुंबई व स्वायत नागरी संस्थामधील महिलांचा सहभाग” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईचे मा.महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी मंदिर सभागृह, एन.सी.केळकर मार्ग, दादर (पश्चिम) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपमहापौर हेमांगी वरळीकर, प्रसिध्द अभिनेत्री वर्षा उसगांवकर, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सिंधू मसूरकर, बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा सान्वी तांडेल, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहिणी कांबळे, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा विशाखा राऊत, तसेच उपायुक्त (विशेष) निधी चौधरी, नगरसेविका तसेच महापालिकेतील सर्व महिला सहाय्यक आयुक्त, संबंधीत खात्याचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. विधी समितीचे अध्यक्ष ऍड. सुहास वाडकर यांच्या अध्यक्षेतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पुढे बोलताना म्हणाले की, १९९४ साली महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५० टक्के आरक्षण प्राप्त झाल्यानंतर राजकारणामध्ये महिलांचा सहभाग वाढलेला दिसून येतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेत राजकीय क्षेत्रात महिला आरक्षणाचे प्रमाण हे ५० टक्के असले तरी महापालिकेत महिलांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. कायद्याने हे आरक्षण दिले असले तरी महिलांने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपले अस्तित्व सिध्द केले आहे. महिला आज घर, तसेच कार्यालय, व्यवसाय आदी प्रत्येक क्षेत्र हया उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात पारंगतच असल्याचे दिसते. पुरुषांनी महिलांच्या बाबतीत कोणताही अहंकार न दाखवता त्यांचा सन्मान करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महिलांनी आज शिक्षण क्षेत्रात यशस्वी वाटचाल करावी असेही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावेळी सांगितले. प्रसिध्दी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यावेळी म्हणाल्या की, महिला सर्वक्षेत्रांत असुरक्षित असल्याचे दिसते, सिनेक्षेत्रही याला अपवाद नाही. यासाठी सर्व महिलांनी एक दबाव गट म्हणून काम करणे आवश्यक आहे. ज्या-ज्या ठिकाणी महिलांवर अन्याय, अत्याचार किंवा तशा स्वरुपाची वागणूक मिळत असेल तर वेळीच आक्षेप घेतला पाहिजे. असे सांगून सर्व महिलांनी पुढाकार घ्यावा, असेही त्या शेवटी म्हणाल्या. परिसंवादचर्चेत बाजार व उद्यान समिती अध्यक्षा सान्वी तांडेल, नगरसेविका नेहा शाह, सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, चंदा जाधव, डॉ. संगिता हसनाळे, मनिषा रावदेव, पोलीस दक्षता समितीच्या सिमा अगवाने आदीनी सहभाग घेतला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom