प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी वेठीस धरले जाणार नाही

JPN NEWS

कारवाईदरम्यान कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक -
मुंबई । प्रतिनिधी -
राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेनेही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 'प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केली जात असताना कुणाला वेठीस धरले जाणार नाही किंवा काही गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना प्लास्टिक बंदीच्या तपासणीचे काम सोपवले जाईल, त्यांनी स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने आपल्या पोशाखावर 'नेम-प्लेट' लावणे बंधनकारक केले असून कारवाईच्या वेळी आणि कर्तव्यावर असताना प्रत्येक वेळी आपले ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्लास्टिक बंदीविषयी नियोजन बैठकीत दिले आहेत. जे कर्मचारी ज्या भागामध्ये तपासणी करणार असतील, त्याबाबतची माहिती त्यांनी आपल्या वरिष्ठांना आगाऊ स्वरूपात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना तपासणी काम सोपवण्याचे ठरवण्यात आले आहे. यादृष्टीने कर्मचाऱ्यांची निवड करणे, त्यांची कर्तव्यसूची तयार करणे आदी कार्यवाही करण्याचे काम उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांना या बैठकीत सोपवण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी महापालिका कटीबद्ध असून यासाठी महापालिकेच्या स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. बंदीची अंमलबजावणी करतानाच प्लास्टिक पिशव्यांना पर्याय ठरणाऱ्या कापडी वा कागदी पिशव्यांची उपलब्धतता जास्तीतजास्त वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचेही पालिकेने ठरवले आहे. यादृष्टीने महिला बचत गटांच्या सहकार्याने कापडी, कागदी पिशव्या तयार करण्याविषयी महापालिकेच्या स्तरावर कार्यवाही निश्चित करण्यात येत आहे. कापडी, कागदी पिशव्या सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोसायटीमध्येच व्यवस्था करायची असल्यास तशी परवानगी तातडीने देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. प्लास्टिक बंदी राबवत असतानाच घरात असलेल्या प्लास्टिकचे काय करावे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावू शकतो. हे लक्षात घेऊन प्लास्टिक जमा करण्याच्या दृष्टीने मंडया, सार्वजनिक ठिकाणे इत्यादींच्या परिसरात संकलन पिशव्या ठेवाव्यात, असेही आदेश दिले आहेत..
Tags