पालिका विद्यार्थ्याना २२ कोटी रुपयांचे क्रीडा गणवेष

JPN NEWS

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तू, युनिफॉर्म तसेच पौष्टिक आहार दिला जातो. याचाच एक भाग म्हणून महापालिका शाळांमधील १ ली ते १०वीच्या विद्यार्थ्याना शारीरिक शिक्षण अंतर्गत कवायतींसाठी २२ कोटी रुपये खर्च करून क्रीडा गणवेश देणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २००७ पासून २७ शालेय वस्तूंचा पुरवठा केला जातो. शारीरिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस सामूहिक कवायतीं कराव्या लागतात. त्याकरिता विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेष व कॅनव्हासचे शूज उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सन २०१८-१९ व २०१९-२० या दोन शैक्षणिक वर्षांसाठी २२ कोटी ५६ लाख रुपये खर्चून ३ लाख २३ हजार ८९९ क्रीडा गणवेष घेण्यात येणार आहेत. त्यासाठी मे. लाद्रिया टेक्सटाईल प्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटानुसार इयत्ता १ ली ते ४ थीच्या १ लाख ४७ हजार ४९० विद्यार्थ्यांसाठी प्रति गणवेष ६७० रुपये दराने ९ कोटी ८८ लाख १८ हजार ३०० रुपये, इयत्ता ५ वी ते ८ वी च्या १ लाख ४८ हजार ४४४ विदयार्थ्यांसाठी प्रति क्रीडा गणवेष ७१५ रुपये दराने १० कोटी ६१ लाख ४४ हजार ८८२ रुपये तर इयत्ता ८ वी ते १० वी च्या २७ हजार ९६५ विदयार्थ्यांसाठी प्रति गणवेष ७४० रुपये दराने २ कोटी ७ लाख १ हजार ९१ रुपये खर्च केले जाणार आहेत.
Tags