संभाजी भिडेंच्या विरोधात एकही पुरावा नाही - मुख्यमंत्री

JPN NEWS

मुंबई - कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी यांचा सहभाग असल्याचा एकही पुरावा नसून, संबंधित तक्रारदार महिला ही त्यांना ओळखत नाही तर साक्षिदारांनीही तीच साक्ष दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 

कायदा आणि सुव्यवस्थेच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी एका महिलेने मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार करून गुन्हा दाखल केला. मात्र मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना अटक करण्यात आली नाही तर त्यांच्या अटकेसाठी राज्य सरकारने सर्व प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. संभाजी भिडे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा एकही पुरावा नसून, तसे असल्याचे दर्शवित नाही.ज्या महिलेने तक्रार केली आहे ती ही महिला भिडे गुरूजींना ओळखत नाही. शिवाय या प्रकरणातील साक्षिदारांनी हिच साक्ष दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.या घटनेच्या अगोदर सहा महिने भिडे यांचा या भागाशी कसलाही संबंध आला नाही.असे सांगतानाच या प्रकरणाची चौकशी बंद केली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल भेट घेतली व या प्रकरणी भिडे गुरूजींच्या सहभागाचे पुरावे देतो असे सांगितल्याने या पुराव्याचे विश्लेषण केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगून या घटनेला जबाबदार असणा-याला सोडणार नाही असे स्पष्ट केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री -  
भीमा- कोरेगाव येथे झालेली घटना व त्यानंतर राज्यभरात त्याचे उमटलेले प्रतिसाद यास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर मग ती कोणीही असो अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगून श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भीमा- कोरेगाव येथे घडलेल्या घटनेला २०० वर्षे पूर्ण होत असल्याने मोठ्या प्रमाणात समाज जमणार असल्याची कल्पना शासनाला नव्हती व पुरेसा बंदोबस्त लावण्यात आला नसल्याचा गैरसमज व्यक्त करण्यात येत असून वास्तविकत: शासनाला याची पूर्ण कल्पना होती. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

यावेळी पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे 1 पोलीस अधीक्षक, 2 अपर पोलीस अधीक्षक, 5उपअधीक्षक, 50 दुय्यम अधिकारी, 537 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे 50 पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक, 2 बाँब शोधक व नाशक पथक, राज्य राखीव बल क्र. 2 ची 3 अधिकारी व70 कर्मचारी असलेली 1 कंपनी, 83 गृहरक्षक दलाचे जवान, याबरोबरच कोल्हापूर, सांगली तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचेही पथक नियुक्त करण्यात आले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयानेही राज्य राखीव बलाच्या 2 कंपन्या आणि 300 गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

पोलीस आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत होते. मात्र दोन समाजातील गैरसमजामुळे घोषणाबाजी व दगडफेक झाली. त्यानंतरही कोरेगाव-भीमा येथील विजय स्तंभाकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही याची काळजी पोलीस दल घेत होते. या घटनेनंतर पुण्याकडून विजय स्तंभाच्या दर्शनासाठी येणारी व जाणारी वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र पुलाच्या पलीकडे दोन समाजात झालेल्या घोषणाबाजी, दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ यामुळे अहमदनगरहून येणारी व जाणारी भाविकांची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. पुण्याच्या दिशेने लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त गर्दीमुळे पुलापलीकडे अहमदनगरच्या दिशेने पोहोचू शकला नाही व त्या बाजूला भाविकांना त्रास सोसावा लागला तसेच दगडफेकीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतरही पोलिसांनी योग्य जबाबदारी पार पाडल्यामुळे रात्री उशीरापर्यंत विजयस्तभांच्या दर्शनामध्ये अजिबात खंड पडला नाही. त्यानंतर भाविकांची परतण्याची सोय राज्य परिवहन विभागाच्या बसेसच्या माध्यमातून करण्यात आली.

ही घडलेली घटना दुर्देवी आहे. मात्र, या घटनेची तसेच घटनेनंतर राज्यभरात उमटलेल्या प्रतिसादामुळे झालेल्या हानीची व्हिडीओ क्लीप्स मोठ्या प्रमाणात पोलीस दलाकडे उपलब्ध आहेत. भीमा- कोरेगाव घटनेच्या अनुषंगाने राज्यात 17 ॲट्रॉसिटीचे गुन्हे व इतर कायद्यान्वये622 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 1199 जणांना अटक करण्यात आली असून2954 प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 13 कोटी 80 लाख रुपयांहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. या भीमा कोरेगावच्या घटनेत पुणे जिल्ह्यातील 1 आणि नंतरच्या बंद दरम्यान नांदेड मध्ये 1 व्यक्ती मृत्यू पावली. या प्रकरणात मिलींद एकबोटे यांना अटक करण्यासाठी राज्य शासनाने सर्व ते प्रयत्न केले. त्यांना अटक करण्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयापर्यंत जामीन मिळू नये यासाठी काळजी घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी देशाचे महान्यायवादी यांची नियुक्ती केली. त्याप्रमाणे प्रयत्न केल्यामुळे त्यांना अटक करुन पोलीस कोठडी मिळवली, असेही ते म्हणाले. या घटनेला जबाबदार असलेली कोणतीही व्यक्ती असली तरी तिच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. अप्रत्यक्ष संबंधित असलेल्यांवरही कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.