AD BANNER

राज्यात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट - मुख्यमंत्री


मुंबई - गृह विभागाने हाती घेतलेल्या व्यापक उपाययोजनांमुळे राज्यात बहुतांश प्रकारच्या गुन्ह्यात घट झाली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यस्था संपूर्ण नियंत्रणात आहे. राज्यातील सर्वच समाज घटकाला सुरक्षितता वाटेल यासाठी शासनाकडून पोलीस दलाचे आधुनिकीकरण तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अद्ययावतीकरण करण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरील २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, अनिल गोटे, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू,ॲड. आशिष शेलार, शशिकांत शिंदे, सुरेश गोरे, भारत भालके, शरद सोनावणे, यशोमती ठाकूर आदींनी या चर्चेत भाग घेतला होता. यावरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते.

गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी घट -
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची बाब खरी नसून वास्तवात गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली आहे. खुनाच्या गुन्ह्यात 21 टक्क्यांनी, दरोड्याच्या गुन्ह्यात 26 टक्क्यांनी, अग्निशस्त्रासह दरोडे 9.5 टक्क्यांनी, जबरी चोरी 31 टक्क्यांनी,अग्निशस्त्रासह जबरी चोरी 29 टक्क्यांनी, घरफोडी 29 टक्क्यांनी, दंगे 1.52 टक्क्यांनी,जातीय दंगे 37.37 टक्क्यांनी तर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात 53 टक्क्यांनी घट झाली आहे.

रेल्वे विभागात चोरी गेलेले किंवा गहाळ झालेल्या मोबाईल व इतर वस्तूंची गहाळ म्हणून नोंद घेतली जात असे. परंतु, आता ही नोंद गहाळ म्हणून न घेता चोरी या स्वरुपातच समाविष्ट केली गेली असल्याने चोरीच्या गुन्ह्यात वाढ झालेली दिसून येते.

फौजदारी कायदा अधिनियम 2013 मध्ये सुधारणा करण्यात आल्याने यापूर्वी बलात्काराच्या व्याख्येची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यापूर्वी बलात्काराच्या व्याख्येत समाविष्ट न होणाऱ्या गुन्ह्यांची 2013 पासून बलात्कार म्हणून नोंद केली जात असल्याने बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बलात्काराच्या व्याख्येची व्याप्ती वाढविल्यामुळे बहुतांश गुन्ह्यांची नोंद होत असल्याने दोष सिद्धी होऊन शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये देशामध्ये महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर असून बलात्काराच्या गुन्ह्यात 15 व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे या गुन्ह्यात महाराष्ट्र वरच्या क्रमांकावर आहे हा गैरसमज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले -
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण (रेट ऑफ कन्व्हिक्शन) वाढले आहे. भारतीय दंड संहितेनुसारच्या गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण साधारणत: 33 टक्क्यांपर्यंत गेले आहे. 2011 मध्ये हे प्रमाण 8 टक्के, 2012 मध्ये 9 टक्के इतकेच होते. तसेच केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे कायदे यासह एकूण गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण 2012 मध्ये 23 टक्के होते ते आता 54 टक्क्यांवर गेले आहे. ‘रेट ऑफ कन्व्हिक्शन’मध्ये वाढ झाल्याने गुन्हेगारांच्या मनात भय निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.

नागपूरमधील गुन्ह्यातही 28 हजार 558 ची घट झाली असून सेफ्टी पर्सेप्शन इंडेक्शनमध्ये नागपूर वरच्या क्रमांकावर आहे, असे सांगून त्यांनी पुढे माहिती दिली, राज्यात प्रत्येक जिल्ह्याला फिरते फॉरेन्सिक युनिट देण्यात आले आहे. फॉरेन्सिक लॅबचे संगणकीकरण, शासकीय अभियोक्ता कार्यालयाचे संगणकीकरण, डायल 112 ची सुविधा, इ- चालान या प्रकल्पांमुळे पोलीस दलाला कामकाजामध्ये मोठी मदत होणार असून पारदर्शकताही येणार आहे. मुंबई शहरामध्ये इन्टेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम तयार करण्यात येत असून त्यामुळे वाहतुकीचे नियमन करणे सोपे होईल. प्रत्येक पोलीस ठाण्यात व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम निर्माण करण्यात येत असून, त्यामुळे पोलिसांचा जनतेशी सुसंवाद वाढेल.

पोलिसांसाठी ४० हजार घरांचे नियोजन -
पोलिसांसाठी निवासाची व्यवस्था करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. पोलिसांसाठी ४ हजार घरे पूर्ण झाली आहेत. १२१६ घरांच्या निविदा काढण्यात आल्या असून खासगी भागीदारीतून सहा हजार घरे प्राप्त होणार आहेत. पोलिसांसाठी एकूण ४० हजार घरांचे नियोजन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post