विद्यार्थिनीचा विनयभंग प्राध्यापकाला अटक

JPN NEWS

मुंबई - घाटकोपर येथील सुप्रसिद्ध असलेल्या गुरुकुल शिक्षण संस्थेच्या डी. जे. दोशी ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा प्राध्यापकांकडून विनयभंग करण्यात आल्याचं प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर अकाऊंट्स शिकवणाऱ्या इम्रान खान या प्राध्यापकाला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे पंतनगर परिसरात खळबळ उडाली असून काही काळ या परिसरात तणावाची स्थिती होती.

उपलब्ध माहितीनुसार डी. जे. दोशी ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला बुक किपिंग या विषयात कमी गुण मिळाले होते. हे गुण मुद्दाम कमी दिले आहेत. गुण वाढवून देण्याच्या नावाखाली या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. घाबरलेल्या स्थितीत ही मुलगी काही दिवस अचानक आजारी पडली. यावर घरच्यांना संशय आल्याने त्यांनी तिला विचारणा केली असता झालेली घटना तिने पालकांना सांगितली. पालकांसह काही सामाजिक संस्थांनी शनिवारी गुरुकुल येथे जाऊन या प्राध्यापकाला विचारणा केली असता त्याने अरेरावीची उत्तरे दिल्यानंतर या सर्वांनी त्याला चोप दिला आणि पोलिसांना याची माहिती दिली. पंतनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. पंतनगर पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येऊन त्याला अटक केली आहे. या प्रकरणात महाविद्यालय प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर हा शिक्षक अशाच प्रकारे आणखीही काही विद्यार्थिनींना त्रास देत असल्याचे काही पालकांनी आणि पोलीस ठाण्यात उपस्थित नागरिकांनी सांगितले..
Tags