Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

माहूलमधील इमारतींची दुरुस्ती व सोयीसुविधांसाठी पालिका १४ कोटीं खर्च करणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईमध्ये अनेक विकास कामे व प्रकल्प सुरु आहेत. या विकासकामात व प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना चेंबूर माहुल येथे पाठवण्यात येते. माहुलमध्ये सोयी सुविधा नसल्याने या ठिकाणी कोणीही राहण्यास तयार नसतात. या विभागात राहण्यास पाठवले म्हणजे नरकात पाठवले असे संबोधले जाते. या विभागात सोयी सुविधा नसल्याने महापौर, विरोधी पक्ष नेते व गटनेत्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर या विभागाची परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून माहुलमधील डी. बी. डेव्हलपर या विकासकाने बांधलेल्या एव्हरस्माईल संकुलातील इमारतींची दुरुस्ती व सोयीसुविधा पुरण्यासाठी पालिकेने १४ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांना राहण्यास पाठवणे म्हणजे नरकयातना देणे अशी टिका सातत्याने प्रशासनावर होत आली आहे. माहुलच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. याच दरम्यान माहुलचा प्रश्न स्थायी समिती व पालिका सभागृहात चांगलाच गाजला होता. महापौर, विरोधी पक्ष नेते, गट नेते यांनी माहुलला भेट दिली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाबरोबर बैठक घेतली. यावेळी माहूलच्या इमारती दुरुस्तीचे व सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने डी. बी. रियालिटी या विकासकाने बांधलेल्या प्रकल्पबाधितांसाठीच्या इमारतींची दुरुस्ती करण्याचे दोन प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केले आहेत. त्यानुसार देव इंजिनिअर्स कडून इमारत क्रमांक २,३,४,५,७,८,९,१०,११,६०,६१,६३ या १२ इमारतीची दुरुस्तीकरून घेतली जाणार आहे. त्यासाठी ६ कोटी ८३ लाख ४७ हजार ६१० रुपये खर्च केला जाणार आहे. तर भव्य इंटरप्रायझेसकडून १,६,३७,३८,३९,४१,४२,५६,५७,६४, या १० इमारतींची दुरुस्ती करून घेतली जाणार आहे. त्यासाठी ७ कोटी ३४ लक्ष ५ हजार ९०५ रुपये खर्च केले जाणार आहेत. या दुरुस्तीच्या कामात पाणीपुरवठा, सांडपाणी, पावसाळी पाणी वाहून नेणारी पाईपलाईन बसवणे, खोल्यांमधील व संडास बाथरूममधील लाद्या बदलणे, संडास बाथरूममधील लिकेज बंद करणे, दरवाजे एल्युमिनियमच्या खिडक्या दरवाजे दुरुस्त करणे बसविणे, सांडपाणी वाहून नेणारे पाईप चेंबर व लाईनची दुरुस्ती केली जाणार आहे.

प्रस्तावावरून होणार खडाजंगी - 
दरम्यान माहूलमधील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी पालिका १४ कोटी रुपये खर्च करणार असली तरी त्यासाठी दोन वेगवेगळे प्रस्ताव आणले आहेत. दोन कंत्राटदारांना दुरुस्तीची कामे वाटून देण्यात आली आहेत. त्यासाठी दोन वेगवेगळे प्रस्ताव सादर का करण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच माहुलमधील इमारती डी. बी. रियालिटी या विकासकाने बांधल्या होत्या. त्या इमारतींची इतक्या कमी वर्षात दुरुस्ती करावी लागणार असल्याने या विकासकाने केलेल्या बांधकामावरून आणि त्याठिकाणी पुरवलेल्या सोयीसुविधांवरून स्थायी समिती सदस्य प्रशासनाला धारेवर धरणार आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom