पनवेल पालिका आयुक्तांवर अविश्वास ठराव मंजूर

JPN NEWS

पनवेल - पनवेल महापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर विशेष महासभेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. ठरावाच्या बाजूने ५०, तर विरोधात २२ नगरसेवकांनी मतदान केले. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही सभा पार पडली. विरोधकांनी सभागृहात आयुक्त बचावच्या घोषणा दिल्या. घोषणांना सुरुवात केल्यानंतर नगरसेवक हरेश केणी व्यासपीठावर आले. महापौर कविता चौतमोल यांनी त्यांना व्यासपीठावरून खाली उतरण्यास सांगितले. ते खाली उतरले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

अविश्वास ठरावाचे कारण सांगताना स्थायी समिती सभापती अमर पाटील म्हणाले, आयुक्तांच्या हेकेखोर स्वभावामुळे पनवेलचे नुकसान झाले आहे. विकास साधता आला नाही. अर्थसंकल्पात फुगीर आकडेवारी दिली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याविरोधात रोष आहे. ते महासभेला गैरहजर असतात. नीलेश बाविस्कर म्हणाले, पाण्याच्या समस्येला आयुक्त जबाबदार आहेत. २९ गावांत पाण्याचे योग्य नियोजन केले नसल्याने नागरिकांना कूपनलिकेचे पाणी प्यावे लागते. अमृत योजना आणण्यात आ. प्रशांत ठाकूर यांचा वाटा आहे. सतीश पाटील म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधकांच्या भांडणात पालिकेची पाटी कोरी राहिली असून या आयुक्तांना हटवल्यानंतर येणारा अधिकारी कार्यक्षम असेल याची खात्री आहे? सध्याचे आयुक्तच राहावेत. नेत्रा पाटील म्हणाल्या, आयुक्त खोटी आश्वासने देऊन मोकळे होतात, कार्यवाही होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला आम्हाला बळी पडावे लागते. जगदीश गायकवाड म्हणाले, हागणदारीमुक्त शहर आणि प्लास्टिक बंदी कागदावर आहे. कृती शून्य असून केवळ कागदोपत्री घोडे नाचवत आहेत. आकृतीबंद जर शासनाकडे पाठवला असता, तर बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. मनोज भुजबळ म्हणाले, सिडको वसाहतीत कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. त्याला आयुक्त जबाबदार आहेत. नितीन पाटील म्हणाले, आ. ठाकूर यांनी पालिकेसाठी प्रयत्न केल्याने महापालिका अस्तित्वात आली. हे आयुक्त शहराचा चांगला विकास करतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. शेवटी विरोधी पक्षनेत्यांनी ठरावाच्या विरोधात बाजू मांडताना सत्ताधारी पक्ष केवळ विरोध करत आहे. प्रीतम म्हात्रे यांनी अविश्वास ठराव न मांडता विश्वासदर्शक ठराव मांडावा, अशी मागणी केली. यावर सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले, शहराचा विकास झाला नाही याला आयुक्त कसे जबाबदार आहेत, याची माहिती दिली. .