महिला पदाधिकाऱ्याने शिवसेना विभाग प्रमुखाच्या श्रीमुखात लगावली

JPN NEWS

मुंबई । प्रतिनिधी - शिवसेनेमध्ये केल्या जाणाऱ्या नियुक्त्या वादग्रस्त ठरत आहेत. बाहेरील पक्षातून आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शिवसेनेची पदे दिली जात असल्याने जुन्या शिवसनसैनिकांनी नाराजी व्यक्त करत परिसरात बॅनर लावले होते. हे प्रकार ताजे असतानाच घाटकोपरचे शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांना एका महिला शिवसेना पदाधिकाऱ्याने श्रीमुखात लगावल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. या सर्व प्रकारानंतर शिवाजी नगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांत झालेल्या चर्चेअंती या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला आहे.

घाटकोपर विभागामधे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती राजेंद्र राऊत हे करत आहेत. गुरुवारी शिवाजी नगरमध्ये महिला पदाधिकाऱ्यांची पद नियुक्ती कार्यक्रम राम मंदिर मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्या काही महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावर पालवे नावाच्या महिला पदाधिकाऱ्याने राऊत यांच्या या पद नियुक्तीला हरकत घेत जाब विचारला. त्यावेळी दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्या महिलेने राजेंद्र राऊत यांच्या कानफाटात लगावली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ उडाला. या सर्व प्रकाराने संतप्त झालेले राजेंद्र राऊत आणि पालवे हे आपल्या समर्थकांसह शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. मात्र, हे प्रकरण न वाढवता पक्षार्तंगत मिटवून घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याने रात्री २ वाजताच्या सुमारास पोलिसांच्या मध्यस्थीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सामजस्यांची चर्चा केल्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला. या सर्व घटनाक्रमामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांना मात्र जवळपास ४ तास चोख पोलीस बंदोबस्त करावा लागला. झालेल्या हा सर्वप्रकार गैरसमजातून झाला असल्यामुळे मी पोलीस तक्रार दिली नाही, अशी प्रतिक्रिया राजेंद्र राऊत यांनी दिली.
Tags