Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महापालिकेकडून “क्षयरोगमुक्त मुंबई मोहिमेला” सुरुवात


मुंबई । प्रतिनिधी - भारत सरकारच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत “क्षयमुक्त भारत” ची घोषणा केली आहे. त्याच अनुषंगाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मुंबई महापालिकेने 15 ते 31 मार्च दरम्यान “क्षयरोगमुक्त मुंबई मोहिम” सुरु केली आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इमारतीवर लाल रंगाची विद्युत रोषणाई करुन मोहिमेला सुरुवात केली आहे. शेजारी असलेले छत्रपति शिवाजी महाराज रेल्वेची ऐतिहासीक इमारतीवर ही लाल रोषणाई करुन त्यांचा क्षयरोगमुक्त मुंबईत या मोहिमेत आपला सहभाग दर्शविला आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने सन 2017 मध्ये सार्वजनिक व खाजगी रुग्णलयात 45 हजार 675 औषध संवेदनशिल रुग्ण अधिसुचित करण्यात आले आहेत. ही सुची अद्यावत होत आहे. मुंबईत वाढविण्यात आलेल्या निदान केंद्र व खाजगी क्षेत्रातून नोंद झालेले क्षयरुग्ण व जनजागृती यांमुळे क्षयरुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. 2017 मध्ये 4 हजार 891 नविन औषध प्रतिरोधी क्षय रुग्णांची नोंदणी झाली होती. यापैकी 670 इतके एक्सडीआर रुग्ण होते. ज्यात खाजगी रुग्णालयातील रुग्णांवर देखील मोफत उपचार करण्यात आले आहेत. मुंबईत क्षय रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मुंबई महापालिकेने क्षयरोग संशयितांना मोफत एक्स-रे खाजगी एक्स-रे चिकित्सालय मधुन सुविधा उपलब्ध केली आहे. एकूण 18 हजार रूग्णांना मोफत एक्स-रे उपलब्ध करून दिले आहे. औषध प्रतिरोधी क्षय निदानासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मशीनमध्ये वाढ करून 8 CBNAAT मशीन जास्त लावण्यात आल्या आहेत. या सर्व 28 मशीनवर सरकारी व खाजगी रुग्णांचे नमूने तपासले जात आहेत. 2017 मध्ये आतापर्यंत एकूण 72 हजार 67 चाचण्या करण्यात आल्या आहेत. 150 ते 200 औषध विक्रेत्यांव्दारे मोफत एफडीसी औषधे रुग्णांना पुरविली जात आहेत. औषध प्रतिरोधी क्षय रुग्णांच्या उपचारासाठी नविन पाच बाहयरुग्ण डीआरटीबी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. शहरात एकूण 14 बाहयरुग्ण व आंतररुग्ण डीआरटीबी केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. फेब्रुवारी सन 2018 पासुन सर्व एम.डी.आर. रुग्णांना दर महिन्याला रेशन वाटप करण्यात येत आहे. सन 2017 मध्ये - 24 वॉर्डांमधून 3 फे-यांमध्ये घरोघरी सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबवण्यात आली. यात एकूण 17 लाख लोकांची पडताळणी झाली त्यात 6 हजार 630 इतके क्षय संशयित आढळले व 304 इतके क्षयरुग्ण आढळले आहेत. येत्या मे महिन्यापासून सी.एच.व्ही. व ल्युपिन यांच्या सहकार्याने घरोघरी क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींचा क्षयरोगाच्या निर्मुलनामध्ये सक्रीय सहभाग असावा म्हणून महापौरांच्या अध्यक्षतेखाली 2017 मध्ये मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती असे महापालिकेने कळविले आहे.

पालिकेकडून जनजागृती - 
क्षय रोगाबाबत जनजागृतीसाठी महापालिकेकडून 15 ते 31 मार्च दरम्यान ऍनिमेशन चलचित्र व लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकात ‘टीबी हारेगा, देश जीतेगा’ बॅनर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. बेस्ट बसेस थांब्यांबर विद्युत चित्र फलके व होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. बॉम्बे केमिकल्सच्या सहयोगाने 10 मोठया मॉल्स मध्ये जाहिरातीचे थांबे उभारण्यात आले आहेत. मॅक्ल्योईड फार्मास्युटीकल्स यांच्या सहकार्याने बिग एफएम रेडिओ वाहिनीवर जिंगल्स प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तर जेन्सन फार्मास्युटीकल्स यांच्या मार्फत् फिवर 104 FM वर जनजागृती करण्यात येणार आहे. लायन्स क्ल्ब इंटरनॅशनल्स यांच्या सहयोगाने डिजिटल वॉल पेंटिंग्स लावण्यात येणार आहेत.पालिकेच्या शाळांमधून व्हर्चुअल क्लासरुमच्या माध्यमातून जनजागृतीकरीता सभा घेतल्या जात आहेत. विविध ठिकाणी क्षयरोगाचे पथनाटय तसेच रूग्ण मेळावे भरविण्यात येणार आहेत व स्थानिक नगरसेवक आणि समाजसेवी संस्था यांच्या सहकार्याने रॅली आयोजित करण्यात आल्या आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom